ठाण्यातील ‘चिल्ड्रन टेक सेंटर’च्या संशोधनातून पितळ उघडे

मोबाइलची बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी बनावटीच्या पॉवर बँकमध्ये चक्क माती व रेती असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला आहे. मुंबईतील लॅमिंग्टन रोडपासून ते ठाण्यातील प्रत्येक रस्त्यावर विक्री करण्यात येणाऱ्या पॉवर बँकचे पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने निरीक्षण करून हा निष्कर्ष मांडला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. पॉवरबँकमध्ये रेती आणि माती भरून त्याचे वजन वाढवून त्यांची क्षमता मोठी असल्याचे भासवले जाते. मात्र त्यावर दिलेल्या माहितीपेक्षाही हे पॉवरबँक अत्यंत कमी क्षमतेचे असतात. याप्रकरणी दोषी असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. चिनी बनावटीच्या बहुतेक पॉवरबँक या बनावटच असल्याचा दावा या संशोधनात कार्यरत शिक्षक व्ही. श्रीनिवासन यांनी केला आहे.

घराबाहेर असताना बॅटरी चार्ज करण्यासाठी पॉवरबँकचा वापर वाढला आहे. चांगल्या दर्जाच्या पॉवरबँक महागडय़ा असल्यामुळे अनेक जण स्वस्त आणि चिनी बनावटीच्या पॉवरबँक खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो. ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या कंदिलासाठी पॉवरबँकचा वापर करायचा होता. त्यासाठी त्यांनी  मुंबई, ठाण्यातील विविध भागांमध्ये पॉवरबँकची खरेदी केल्या. त्यांना त्या शास्त्रोक्त पद्धतीने उघडून त्यांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करायचा होता.

पॉवरबँक उघडल्यानंतर त्यांना हे धक्कादायक चित्र दिसले. पॉवरबँकच्या आवरणावर दिलेल्या माहितीपेक्षा कमी क्षमतेचा एक विद्युत घट त्यामध्ये जोडल्याचे दिसले. अन्य विद्युत घटांमध्ये रसायन अथवा कार्बन वापरण्याऐवजी चक्क माती आणि रेती भरण्यात आली होती.

विद्यार्थ्यांची निरीक्षणे..

* रस्त्यावर विकत मिळणाऱ्या पॉवरबँक ९९ टक्क्यांहून अधिक बनावट असतात.

* दिलेल्या क्षमतांच्या तुलनेत कित्येकपट कमी क्षमतेचा विद्युत घट त्यामध्ये असतो.

* वजन वाढवण्यासाठी रेती, माती सारख्या अनावश्यक घटक त्यामध्ये भरलेले असतात.

* वजनापेक्षा त्यांच्या खरेपणाची चाचणी करणे गरजेचे आहे.

* अनेक नामांकित कंपन्यांच्या नावेही अशाप्रकारचा माल विकला जात आहे.

* भारतीय बनावटीच्या पॉवरबँकमध्ये प्रामुख्याने फसवणूक होत नाही.

चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला हा अनुभव अत्यंत धक्कादायक असून पॉवरबँकची अंतर्गत रचना एकदम चांगली दिसत असली तरी त्यामध्ये केवळ निरुपयोगी वस्तूंचा भरणा अधिक असतो. पॉवरबँकमध्ये असलेल्या बॅटरी एकमेकांना जोडलेल्याही नसतात. त्यावरून हा खोटेपणा सिद्ध होतो. अशा फसवणूक करणाऱ्या प्रकारांना वेळीच पायबंद घालण्यासाठी अशा बनावट आणि चिनी वस्तूंपासून दूर राहणे अधिक योग्य ठरू शकेल.

– पुरुषोत्तम पाचपांडे, संशोधक, चिल्ड्रन टेक सेंटर