scorecardresearch

घर खर्च भागवण्यासाठी गहाण ठेवलेली कार परस्पर विकली; कल्याणमधील रहिवाशाची फसवणूक!

बनावट कागदपत्र तयार करून विक्री व्यवहार केला असण्याचा संशय

crime
(फाईल फोटो)

करोनाच्या कालावधीत घरात आई-वडील करोनाने आजारी होते. आजारपणात त्यांच्यावर लाखो रूपये खर्च करूनही त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत घर खर्च चालविण्यासाठी येथील एका रहिवाशाने आपली कार दोन परिचितांकडे दीड लाख रूपयांच्या बोलीने ठेवली. त्यांच्याकडून मिळणाऱ्या खर्चावर या रहिवाशाचा गाडा सुरू होता. मात्र कार मालकाच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा संबंधित परिचितांनी घेऊन त्यांची कार परस्पर विकून टाकली.

कार विक्रीची माहिती मिळाली तेव्हा कार मालक भूषण पाटील यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात कार गहाण ठेवलेल्या दोन परिचितांविरुध्द तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी शाकीब मुल्ला, राहुल शिवराम परदेशी (राहणार खर्डी, तालुका-शहापूर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

भूषण पाटील कल्याणमधील बैलबाजार भागात राहतात. करोनाच्या काळात त्यांचे आई, वडिल आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी भूषण यांनी लाखो रूपये खर्च केले. पण ते दोन्हीही दगावले. घऱ् खर्चासाठी सांभाळून ठेवलेला पैसा रुग्णालयात खर्च झाल्याने घरगाडा कसा चालवायचा असा प्रश्न भूषण यांना पडला. त्यांनी स्वत:च्या मालकीची कार दीड लाख रूपये बोलीवर दहा टक्के व्याजाने शहापूर खर्डी येथील आपले परिचित शाकीब, राहुल यांच्याकडे गहाण ठेवली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या पैशांमधून भूषण यांनी काही देणी फेडली. घरखर्च भागविण्यास सुरूवात केली. या व्यवहाराचे प्रतिज्ञापत्र पाटील यांनी तयार केले होते. ते आरोपींनी आपल्या ताब्यात ठेवले होते. पाटील यांना १० टक्के व्याज कापून आरोपींनी एक लाख २० हजार रूपये दिले होते.

पाटील यांची परिस्थिती सुस्थितीत झाल्यावर त्यांनी तुमचे पैसे परत करतो माझी कार मला परत करा, असे परिचितांना कळविले. तेव्हा आरोपींनी पैसे ऑनलाईन पाठवा आणि एक तासात वाहन तुमच्या दारात येईल, असे कळविले.

भूषण यांनी राहुल परदेशीच्या बँक खात्यावर ऑनलाईन व्यवहारातून २५ हजार रूपये पाठविले. उर्वरित रक्कम वाहन दारात आले की देतो असे सांगितले. भूषण वाहनाची वाट पाहत बसले अनेक दिवस उलटूनही कार दिली गेली नाही. शिवाय शाकीब, राहुलचे मोबाईलही बंद असल्याने भूषण यांनी खर्डी येथे जाऊन तपास केला तेव्हा त्यांना शाकीब, राहुलने गाडी दहिसर येथे विकली असल्याचे समजे. हे वाहन भूषण यांच्या वडिलांच्या नावाववर आहे. तरीही बनावट कागदपत्र तयार करून त्यांनी विक्री व्यवहार केला असण्याचा संशय भूषण पाटील यांना आहे. पोलिसांनी आरोपींचा आणि वाहन खरेदी करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sold mortgaged car cheated the citizen of kalyan msr

ताज्या बातम्या