ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात सातत्याने त्यांच्या भाषणावेळी माईक बदलले जात होते. यावेळी एकनाथ शिंदे हे मिश्किलपणे म्हणाले, कोणीतरी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय, एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. माझा आवाज जनतेचा आवाज आहे, तो कोणीही बंद करू शकणार नाही असे म्हणताच, सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

गिर्यारोहक लेखक शरद कुलकर्णी यांच्या अनुभवावर आधारित ‘ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक माईक होता. सुमारे १५ ते २० मिनीटे भाषण केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोरील तो माईक बदलण्यात आला. त्यानंतर पुन्हा १० मिनीटांनी दुसरा माईक बाजूला ठेवून तिसरा माईक एकनाथ शिंदे यांच्या हाती देण्यात आला. त्यानंतर माईक बदलणाऱ्याला एकनाथ शिंदे हसत म्हणाले, ‘चौथा माईक आणणार आहात का?’ त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे म्हणाले. कोणीतरी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. परंतु माझा आवाज जनतेचा आवाज आहे, तो कोणीही बंद करू शकणार नाही असे म्हणताच, उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की, ठाण्यात खूप धाडसी लोक राहतात. अडीच ते तीन वर्षांपूर्वीचे एक धाडस महाराष्ट्राने, देशाने पाहिले. जगातील ३२ देशांनी त्याची नोंद घेतली. कारण हे सत्ता पालटण्यासाठी नव्हते. राज्याला पुढे कसे नेता येईल त्यासाठी ते आम्ही केले होते. सत्तेतून आम्ही पाय उतार झालो. मी एक कार्यकर्ता आहे. ५० आमदार एका व्यक्ती, कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतात हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. सध्याच्या काळात सरपंच इकडचा तिकडे जाताना विचार करतो. येथे तर मंत्रीपद, आमदारकी होती. जनतेने आम्हाला स्विकारले आहे. ठाणे निसर्गसंपन्न आहे. शहरात मेट्रोची कामे सुरू आहे. रस्ते रुंद होत आहेत. येऊरचे जंगल, तलाव आहे. ठाणे आता बदलत आहेत. लोक ठाण्याला पसंत करत आहेत असेही शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद कुलकर्णी यांचे गिर्यारोहणातील काम प्रेरणादायी आहे. वयाच्या ५० वर्षानंतर जगातील सात खंडातील अवघड शिखरे सर करण्याचा ध्यास कुलकर्णी यांनी घेतला. सतत १० वर्ष प्रयत्न करून वयाच्या ६० व्या वर्षी हे ध्येय पूर्ण केले. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी अंजली यांची साथ मिळाली होती. परंतु एव्हरेस्ट शिखर उतरताना अंजली यांचा मृत्यू झाला. काही गोष्टी वैयक्तीक आयुष्यात गमवाव्या लागतात. तसेच शरद कुलकर्णी यांना अंजली यांना गमवावे लागले. मी देखील २० वर्षांपूर्वी फार मोठा आघात सहन केला. डोंगराऐवढे दु:ख होते. मी कोलमडून गेलो होतो. परंतु तेव्हा दिवंगत आनंद दिघे म्हणाले होते की, किती दिवस घरात बसणार, तुला सर्वसामान्य माणसांसाठी जगायचे आहे. तेव्हा मला ठाणे महापालिकेतील सभागृह नेत्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. राज्याचा मुख्यमंत्री झालो असेही शिंदे म्हणाले.