– बांधकाम साहित्य पुरविण्याचा ठेका दिला नाही म्हणून गुंडागर्दी
कल्याण – कल्याण शहरातील विकासक मंगेश गायकर यांनी आपणास वडवली येथील नवीन गृहप्रकल्पात इमारत बांधकाम साहित्य टाकण्याचे काम दिले नाही, या रागातून वडवली गावातील सात जणांच्या एका टोळक्याने इमारत बांधकामाच्या ठिकाणी येऊन दहशतीचा अवलंब करत तेथील विक्री कार्यालयातील कर्मचारी, कामगारांना शिवीगाळ केली. जोपर्यंत आमच्याकडून इमारत बांधकाम साहित्य घेत नाहीत, तोपर्यंत बांधकाम बंद ठेवावे आणि प्रत्येक वाहनामागे तीन हजार रूपये द्यावे. या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर आपणास जीवे ठार मारले जाईल, अशी धमकी दिली आहे.
या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडाली आहे. मंगेश गायकर हे कल्याण शहर परिसरातील प्रसिध्द विकासक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते कल्याण डोंबिवली पालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून सक्रिय होते. विकासक गायकर हे स्थानिक असुनही त्यांनाही वडवलीतील टोळक्याने दहशतीचा अवलंब करून बांधकाम बंद करण्यास लावल्याने विकासकांच्या संघटनेत नाराजी व्यक्त केली जात आहे.
दहशतीचा अवलंब करणाऱ्या टोळक्यामध्ये वडवलीतील शिंदे शिवसेनेतील एका माजी नगरसेवकाच्या मुलांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवर या टोळक्याची प्रचंड दहशत आहे. गेल्या वर्षी पालिकेच्या अ प्रभागातील एका कर्मचाऱ्याने वडवली परिसरातील बेकायदा चाळींवर कारवाई केली होती. त्यावेळी वडवली भागातील स्थानिकांनी या कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला होता. वडवलीतील एका लोकप्रतिनिधीवर यापूर्वी पोलिसांनी तडिपाराची कारवाई सुरू केली होती. राजकीय दबावामुळे ही कारवाई टळली.
खडकपाडा पोलीस ठाण्यात विकासक मंगेश दशरथ गायकर (५८) यांनी या गुंडागर्दीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची मुले वैभव दुर्योधन पाटील, पंकज दुर्योधन पाटील, याशिवाय सुनील राजाराम पाटील, उध्दव राकेश पाटील, ध्रुव जनार्दन पाटील, करण सुधीर पाटील (सर्व राहणार वडवली) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
गायकर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, गुन्हा दाखल इसम हे आपल्या कल्याण जवळील वडवली येथील मंगेश स्टार, मंगेशी हेवन आणि जेमिनी या इमारत बांधकामाच्या ठिकाणी गेल्या महिन्यात सकाळच्या वेळेत हातात लाकडी दांडके घेऊन आले. बांधकामाच्या ठिकाणच्या विक्री कार्यालयात बेकायदा घुसून तेथील महिला, पुरूष कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यास सांगून कार्यालयाबाहेर काढले. यावेळी सुनील पाटील यांनी उपस्थित कामगार, कर्मचाऱ्यांना बेसुमार शिवीगाळ करत आम्हाला तुम्ही काम देत नाही का, असे प्रश्न केले. वैभव यांनी शामल कोठे आहे.
तुझ्यात हिम्मत असेल तर बांधकामाच्या ठिकाणी येऊन दाखव असे बोलून शिवीगाळ केली. आमच्याकडून तुम्हाला बांधकाम साहित्य घ्यावे लागले. नाही घेतले तर प्रत्येक वाहनामागे तीन हजार रूपये द्यावे लागतील. पैसे देत नाहीत तोपर्यंत बांधकाम बंद ठेवायचे. अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी उपस्थितांना टोळक्याने दिली. याप्रकरणाचा साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड तपास करत आहेत.
