कल्याण : दिवा ते कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रविवारी रेल्वे प्रशासनातर्फे विशेष अभियांत्रिकी काम केले जाणार आहे. त्यामुळे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या कालावधीत या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. धीम्या गती रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली ते कल्याण दरम्यान विशेष बस सेवा उपलब्ध करुन दिली आहे. 

    या मार्गावर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून चार विशेष बस धावणार आहेत. प्रवाशांची गर्दी वाढेल त्याप्रमाणे बसची संख्या वाढविण्याचे नियोजन केले आहे, असे केडीएमटी आगार प्रमुख संदीप भोसले यांनी सांगितले. ठाणे ते डोंबिवली दरम्यान धीम्या  मार्गावरील लोकल वाहतूक बंद राहणार आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद गती मार्ग सुरू राहणार आहे. धीम्या गतीच्या लोकल जलद मार्गावरुन वळविण्यात येणार आहेत. मुंबईकडे जाण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध राहणार असल्याने केडीएमटी प्रशासनाने ठाणे ते कल्याण, डोंबिवली दरम्यान बस सेवेचे केलेले नियोजन रद्द केले आहे. फक्त कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशी रिक्षेने डोंबिवलीत येऊन पुढील प्रवास करू शकतात, असे भोसले यांनी सांगितले.