पालकही उपस्थित राहणार
कुटुंबियांसोबत साजरी केल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. मात्र एरवी निवासी आश्रमात राहणारी, तिथेच रमणारी गतिमंद घरी रमत नाहीत. त्यामुळे बदलापूरजवळील संगोपिता आश्रमाने येत्या रविवारी ८ नोव्हेंबर रोजी आश्रमातच दिवाळी आनंद सोहळा आयोजित केला असून त्यात पालकांना आमंत्रित केले आहे.
या वेळी या मुलांनी बनविलेल्या पणत्या, दिवे, भेटकार्ड व अन्य सजावटीच्या वस्तूंच्या साथीने संगोपितामधील ताऱ्यांची पालकांसोबत दिवाळी साजरी होणार आहे. अभिनेता अमिर खान याच्या ‘तारें जमीं पर’ या चित्रपटाची आठवण करून देणारा व विशेष मुलांना महत्त्व देत त्यांच्यासोबत दिवाळीचा सण साजरा करणारा कार्यक्रम बदलापूरजवळील बेंडशीळ येथे होत आहे. येथील संगोपिता हे गतिमंद व तत्सम मानसिक आजार असलेल्या विशेष मुलांचे केंद्र सुजाता सुगवेकर व त्यांचे पती रवींद्र सुगवेकर हे गेल्या बारा वर्षांपासून चालवितात. शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या केंद्रात सध्या ४५ निवासी व २७ रोज येणारी विविध वयोगटातील विशेष मुले आहेत.
या मुलांपैकी काहींनी दिवाळी निमित्त पणत्या, आकर्षक दिवे, मेणबत्त्या, भेटकार्ड, लिफाफे व अन्य सजावटीच्या वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत. या वस्तूंची निर्मिती गेल्या अनेक दिवसांपासून ही मुले करत आहेत. कारण, यंदा त्यांचे पालक मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आश्रमात येणार आहेत. त्यामुळे येथील राधा त्रिपाठी, सुरेश टिके, रूबी फर्नाडीस, विकास रोकडे, कौस्तुभ जिकमडे या पणत्या रंगवणाऱ्या व अन्य वस्तू बनवणाऱ्या मुलांच्या आनंदात भर पडली असून संपूर्ण केंद्रात आनंदाचे वातावरण आहे, असे संगोपिताच्या सुजाता सुगवेकर म्हणाल्या.

माझा मुलगा सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त असल्याने मी बारा वर्षांपूर्वी स्वत:च अशा मुलांसाठी शाळा काढण्याचा निर्णय घेतला. मला जो सुरुवातील त्रास झाला तो अन्य पालकांना होऊ नये म्हणून शाळा सुरू केली. आज अनेक मुले आमच्या शाळेत आहेत. या मुलांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या आनंदात सहभागी होता यावं, यासाठी हा कार्यक्रम करत आहोत.
– सुजाता सुगवेकर, संस्थापक, संगोपिता केंद्र

कार्यक्रम कधी
मुंबई व अन्य लांबच्या ठिकाणांहून येणाऱ्या पालकांच्या बरोबरीनेच मुंबईच्या रोटरी क्लबचे सदस्य व अन्य पाहुणेही येणार आहेत. ८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते ३ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून यावेळी ही मुले नृत्य, नाटिका असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. असे येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रंजू त्रिपाठी यांनी सांगितले.

संगोपिता आश्रमातील विशेष मुलांनी दिवाळीच्या पणत्या, विविध आकर्षक वस्तू बनविल्या आहेत.