पूर्वीच्या काळी भिवंडीच्या खाडीतून भिवंडी ते गुजरात (वसईमार्गे) व्यापार चालत असे. तांदूळ, लाकूड आणि कापड (हातमाग) या वस्तूंची मुख्यत्वे जहाजाद्वारे ये-जा या ठिकाणी होत असे. याच भिवंडीच्या खाडीतून दक्षिण भारतातही व्यापारासाठी जहाजे जात असत, किंबहुना म्हणूनच भिवंडीच्या या परिसराला ‘बंदर मोहल्ला’ या नावाने आजही ओळखले जाते. भिवंडीत आजमितीला दिसणारी मोठी कुटुंबे व्यापाराच्या निमित्तानेच या ठिकाणी आली असावीत, असे भिवंडीचा इतिहास उलगडताना लक्षात येते. घुले, कांड आणि मेकल ही भिवंडीतील मुख्य घराणी आहेत. साधारण दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी ही कुटुंबे भिवंडीत स्थायिक झाली असावीत. याबरोबरच कर्वे, शेटे, दुर्वे, ताम्हाणे, पिंगळे, वडके, समेळ, तासे, बरडी, फक्की, बुबेरे आदी कुटुंबेही भिवंडी आणि परिसरांत गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. भिवंडी गावात या कुटुंबीयांची भातशेती आणि सावकारी होती. त्यामुळेच आजही भिवंडीत काही भाताच्या गिरण्या पाहायला मिळतात. गावातील निजामपुरा, सौदागर मोहल्ला, बंदर मोहल्ला, भुसार मोहल्ला, तांडेल मोहल्ला, दर्गा रोड, सुतार आळी, हमाल आळी, ब्राह्मण आळी आदी परिसरांत जुन्या वास्तू आजही पाहायला मिळतात. गावातील काही वास्तूंची जागा उंचच उंच इमारतींनी घेतली असली तरीही काही जुन्या वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभी आहेत. भिवंडीतील ब्राह्मण आळीत असणारा ‘जोगळेकर वाडा’ हा त्यांपैकीच एक.

भिवंडीतील ब्राह्मण आळीत प्रवेश केल्यानंतर जुन्या डाक घराजवळच तीन रस्त्यांचा संगम झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. या तीन रस्त्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, त्याच ठिकाणी आपल्याला एक चौपाखी कौलारू घर पाहावयास मिळते. हे घर म्हणजेच ‘जोगळेकर वाडा’ होय. १९१८ मध्ये कै. महादेव कृष्ण जोगळेकर यांनी भट कुटुंबीयांकडून त्या काळी तीनशे ते चारशे रुपयांना हा वाडा खरेदी केला. वाडय़ाच्या जवळ पोहोचल्यानंतर वाडय़ाचे नक्की प्रवेशद्वार कोणते या संभ्रमात आपण पडतो. वाडय़ाच्या एका टोकाला एक दरवाजा दिसतो. या दरवाज्याजवळ पोहोचल्यानंतर मात्र आपल्याला लक्षात येते की, या ठिकाणी महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. वाडय़ात प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथम ओटीचा भाग लागतो. पूर्वीच्या काळी बाहेरून घरात आल्यानंतर पायावर पाणी घेण्याची पद्धत होती. त्यानुसार पायावर पाणी घेण्यासाठी या ठिकाणी छोटी मोरी बांधण्यात आली होती; परंतु काळानुरूप प्रथा बदलल्या आणि १९७५ मध्येच ही मोरी या ठिकाणहून काढून टाकण्यात आली. ओटीतून डाव्या बाजूच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर वाडय़ाचे प्रशस्त असे माजघर लागते. या माजघरातून वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी माडी आहे. माजघराच्या उजव्या हाताला स्वयंपाकघर आहे. ओटीच्या भागातूनही स्वयंपाकघरात जाण्याची सोय आहे.

Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

वाडय़ाचे प्रवेशद्वार शोधत असताना हे मंदिर वाडय़ाचाच भाग असल्याचे आपल्याला जराही जाणवत नाही. १९१८ मध्ये कै. महादेव कृष्ण जोगळेकर यांनी भट कुटुंबीयांकडून हा वाडा खरेदी केला. भट कुटुंबीयांनी जोगळेकर यांना वाडा विकला, त्या वेळी देवीचे करण्याविषयी अट घातली होती. त्यामुळेच आजही या देवीचे नवरात्र आणि अन्य धार्मिक उत्सव या मंदिरात चालतात. उंची कमी असल्याने देवीला नतमस्तक होऊनच मंदिरात आपल्याला प्रवेश करावा लागतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या तेजस्वी प्रतिकृतीचे आपल्याला दर्शन घडते. जोगळेकर वाडय़ात देवीचे मंदिर असल्यानेच हा वाडा कधीही बंद ठेवत नसल्याचे, जोगळेकर कुटुंबीय सांगतात.

जोगळेकर वाडय़ात पूर्वीच्या काळी पाच-सहा भाडेकरू होते. पुढे काळानुरूप प्रत्येक भाडेकरू वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होत गेले; परंतु गेल्या ७० वर्षांपासून शरद मराठे आणि त्यांची पत्नी नीला मराठे या वाडय़ात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. मुळातच वाडय़ामध्ये भाडेकरू आणि मालक असा दुजाभाव पाहायला मिळत नाही. भाडेकरू आणि वाडामालक यांच्यात घरोबा असल्याचे वातावरण या ठिकाणीही पाहायला मिळते. त्यामुळेच जोगळेकर कुटुंबीयांना बाहेर जायचे असल्यास ते खुशालपणे मराठे कुटुंबीयांच्या जबाबदारीवर वाडा सोडून जातात. वाडय़ाच्या तळमजल्यावर जोगळे कुटुंबीय, तर वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर मराठे कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. वाडय़ात आज जोगळेकर कुटुंबीयांची सातवी पिढी वास्तव्यास आहे. पूर्वीच्या काळी १६-१७ माणसांनी हा वाडा गजबजलेला होता. आता मात्र वाडय़ात दिलीप जोगळेकर आणि त्यांची पत्नी अलका जोगळेकर, भाऊ विश्वास जोगळेकर आणि त्यांची पत्नी विशाखा जोगळेकर वास्तव्यास आहेत. दिलीप जोगळेकर यांची मुलगी रश्मी गोरे यांचे वास्तव्य जर्मनीत, तर विश्वास जोगळेकर यांची मुलगी केतकी गाडगीळ यांचे वास्तव्य दुबईमध्ये असते.

जोगळेकर वाडय़ाच्या भिंती २४ इंची आहेत. वाडय़ाचे संपूर्ण बांधकाम लाकूड आणि मातीपासून झालेले आहे. जोगळेकर वाडय़ात एकूण १८ खोल्या आहेत. वाडय़ातील लाकडी वासे, कौले यांची दरवर्षी देखभाल घ्यावी लागते. कौले बदलणे हे खरोखरच जिकिरीचे काम असल्याचे जोगळेकर कुटुंबीय सांगतात. जोगळेकर वाडय़ाला मागचे अंगणही आहे. या अंगणात विहीर, रामफळ, आंब्याचे झाडही पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी घरापासून काही अंतरावर शौचालये बांधण्याची पद्धत होती. त्याप्रमाणेच मागच्या अंगणात ही शौचालये पाहायला मिळतात; परंतु काळ बदलला तशा माणसाची जीवनपद्धतही बदलली. त्यामुळेच वाडय़ाच्या आत आता शौचालये पाहायला मिळतात. वाडय़ातील बाळंतिणीच्या खोलीची जागा आता स्नानगृहाने घेतली आहे.

पूर्वीच्या काळी बाहेरगावाहून विद्यार्थी शिकण्यासाठी भिवंडीत येत असत. शिक्षणाच्या निमित्ताने आलेले हे विद्यार्थी वाडय़ात वास्तव्यास असत. वाडय़ात करायला लागणारी दैनंदिन कामेही ही मंडळी घरातील सदस्यांप्रमाणेच करीत असत. म्हणूनच हे विद्यार्थी वाडय़ातील कुटुंबांपैकी एक मानले जात. वाडय़ात राहत असताना वाडय़ातील माणसांबरोबर जुळून येणारे ऋणानुबंध, वाडय़ाचा या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा संस्कार आज पेईंग गेस्ट म्हणून टू-बीएचके, थ्री-बीएचके फ्लॅटमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कळणारा नाही.

जोगळेकर वाडा

ब्राह्मण आळी, जुन्या डाक घराजवळ,

भिवंडी-४२१ ३०८.