डोंबिवली- ‘तुमची आर्थिक भरभराट करून घ्यायची असेल तर आम्ही पैशांचा पाऊस पाडतो. तुम्ही ५६ लाख रुपये केले तर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पाडून दाखवू,’ असे ढोंगी बुवाबाजी करणाऱ्या एका टोळक्याने डोंबिवलीतील एका विकासकाला सांगितले. या विकासकाने बुवांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ५६ लाख रुपयांची तजवीज करून घरात ५० कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी पुजापाठासाठी चार ढोंगी बुवांना घरात घेतले. या बुवांनी विकासकाला गुंगी तंत्राचा अवलंब करून मोहीत केले आणि पुजेच्या नावाखाली विकासकाच्या कार्यालयातील ५६ लाख रुपयांची रोख रक्कम गोड बोलून लुटून नेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश (गुरुजी, पूर्ण नाव नाही), अशोक गायकवाड, रमेश मोकळे, शर्मा गुरूजी, गणेश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी चार ढोंगी बुवांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, सुरेंद्र पांडुरंग पाटील (५१, रा. अनुसया निवास, महाराष्ट्र बँकेच्या वर, चोळेगाव, ठाकुर्ली) हे विकासक आहेत. त्यांचे दावडी येथील पाटीदार भवन श्री एकविरा स्वप्ननगरी इमारत येथे कार्यालय आहे. तेथेच निवासाचीही व्यवस्था आहे. गेल्या महिन्यात विकासक सुरेंद्र पाटील यांना महेश या ढोंगी बुवाने संपर्क करून आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडणारी काही माणसे आहेत. असे सांगितले होते. त्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आपण अशाप्रकारचा पाऊस पाडून घेण्यास इच्छुक असल्याचे पाटील यांनी महेश यांना सांगितले होते. अशोक शंकर गायकवाड (रा. रामचंद्रनगर, कामगार रुग्णाल जवळ, वागळे इस्टेट, ठाणे) याची ओळख महेशने पाटील यांच्याशी करून दिली.

अशोक नियमित पाटील यांच्या कार्यालयात येत होता. अशोकने आपला परिचित रमेश मोकळे (रा. कसारा) पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून गणेश यासाठी मदत करतील असे सांगितले होते.गणेश या ढोंगी बुवाने पाटील यांना ५६ लाख रुपये खर्च केले तर त्यानंतर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पडेल, असे सांगितले. पाटील यांनी या टोळक्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५६ लाख रुपयांची तजवीज करण्यासाठी पाटील यांनी घरातील सोने कल्याणमधील पारस जवाहिऱ्याकडे गहाण ठेवले. गणेश धार्मिक विधी करणार होता. गणेशने पूजा साहित्याची यादी पाटील यांना दिली. शनिवारी सकाळी पाटीदार भवन जवळील कार्यालयात पाटील यांना पूजेसाठी येण्यास सांगितले. काल सकाळी पाटील आणि त्यांचा चालक आशीष शर्मा हे सकाळी साडे पाच वाजता पोहचले. ढोंगी बुवांमधील गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड कार्यालयात उपस्थित होते.

कार्यालयावरील पाटील यांच्या घरात ढोंगी गुरूंजींनी पूजा मांडली. ५६ लाखाचा बटवा कुठे ठेवला आहे याची खात्री पाटील यांच्याकडून करून घेतली. सकाळी सव्वा सहा वाजता पूजा सुरू झाली. सव्वा आठ वाजता पूजा संपली.गणेश, शर्मा गुरुजींनी पाटील यांना बाजुच्या खोलीत ध्यान मग्न होऊन जप करण्यास सांगितले. पाटील जपाला बसताच या टोळक्याने पाटील यांनी मुलीच्या शय्यागृहात ठेवलेली ५६ लाखाची पुरचंडी गुपचूप काढून घेतली. इमारतीखाली जाऊन पूजा विधी आणि प्रदक्षिणा मारून येतो असे सांगून गुरूजी पळून गेले. बराच उशीर झाला तरी गुरूजी पूजेच्या ठिकाणी येत नाहीत. अशोक तेथे नाही. म्हणून पाटील यांनी परिसरात शोध घेतला. ते दिसून आले नाहीत. पाटील यांनी घरात येऊन पाहिले तर ५६ लाखाचा पुरचंडी गायब झाली होती. पूजापाठ करण्यासाठी आलेल्या ढोंगी बुवांनी आपणास फसविले आहे. हे लक्षात आल्यावर सुधीर पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याने, नरबळी कायद्याने गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spend crore dombivali developer fraud cheats anti superstition act crime amy
First published on: 26-06-2022 at 18:09 IST