एसटीच्या मार्गावर पालिकेची बससेवा

शहरी भागातील एसटी सेवा बंद करण्याच्या एसटी महामंडळाच्या निर्णयाने मोठा पेच निर्माण झाला होता.

एसटी महामंडळ आणि महापालिका वादावर अखेर पडदा; वसईकरांना दिलासा

१ एप्रिलपासून वसई-विरारमधून एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्यानंतर या मार्गावरून बससेवा चालवण्यास महापालिका परिवहनने विरोध केला होता. मात्र परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या वादावर तोडगा निघाला असून या मार्गावरून पालिका परिवहनच्या बस चालवण्यास पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. फक्त एसटीने त्यांच्या जागा नाममात्र दराने पालिकेला वापरासाठी भाडेतत्त्वावर द्यावी, अशी अट घालण्यात आली आहे. परिवहनमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरी भागातील एसटी सेवा बंद करण्याच्या एसटी महामंडळाच्या निर्णयाने मोठा पेच निर्माण झाला होता. एसटी बंद करताना स्थानिक महापालिकांनी परिवहन सेवा सुरू करावी, असे एसटी महामंडळाने म्हटले होते; परंतु वसई-विरार महापालिकेने परिवहन सेवा सुरू करता येणार नाही, असे सांगितल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. १ जानेवारीपासून एसटी बंद केली जाणार होती; परंतु जनतेच्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर या निर्णयाला तीन महिन्यांची तात्पुरती स्थगिती मिळाली होती. एसटी बंद होणार आणि पालिका सेवा देणार नाही, अशा परिस्थितीत सर्वसामान्य वसईकरांचे हाल होत होते. एसटी सेवा वसईमध्ये कायमस्वरूपी सुरू राहावी या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विष्णू सावरा यांना तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार नुकतीच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. एसटी महामंडळ व महापालिका परिवहन सेवा या दोघामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये वसईकर जनता भरडली जाऊ  नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्रांनी केली. त्या वेळी जर एसटीने सेवा बंद केली, तर १ एप्रिल २०१७ पासून हीच सेवा महापालिका परिवहन सेवेमार्फत देण्याची तयारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी दर्शवली.

एसटीने आपली सेवा बंद करू नये, असेही आयुक्त सतीश लोखंडे यांनी बैठकीत स्पष्ट केले. आमची एसटीशी स्पर्धा नाही. एसटी आणि पालिका या दोघांची सेवा नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. एसटीने अचानक सेवा बंद केल्याने आम्हाला तयारीला वेळ मिळाला नाही; परंतु एसटीने त्यांच्या शेड आणि आगाराच्या जागा नाममात्र दरात वापरायला दिल्या तर १ एप्रिलपासून आम्ही सेवा देण्यास तयार

आहोत, असे आयुक्तांनी सांगितले. एसटीने यापूर्वी कल्याण, औरंगाबाद, नागपूर, नांदेड आदी ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यावर एसटीचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी जागा देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. यामुळे १ एप्रिलपासून वसईतल्या एसटीच्या मार्गावर पालिकेची परिवहन सेवा सुरू होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: St and vasai virar corporation bus issue

ताज्या बातम्या