scorecardresearch

ठाणे विभागातील एसटीच्या ९८ सेवा सुरू

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. त्यामुळे एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

प्रवाशांना काही अंशी दिलासा

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. त्यामुळे एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने ठाणे विभागात आठवडय़ापूर्वी ५० कंत्राटी चालक सेवेत रुजू केले आहेत. त्यामुळे ठाणे विभागातून जिल्ह्यातील अंतर्गत भागात तसेच लांब पल्ल्याच्या मिळून आणखी २९ गाडय़ांमध्ये वाढ झाली आहे.

ठाणे १, ठाणे २, भिवंडी, कल्याण, वाडा, विठ्ठलवाडी, शहापूर आणि मुरबाड या आठही आगारात चालक, वाहक, प्रशासकीय आणि कार्यशाळेतील असे एकूण २,७४३ कर्मचारी आहेत. मागील तीन महिन्यांपासून राज्यासह ठाणे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. यामुळे ठाणे जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे सुरू झाली नाही. परिणामी, ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची तसेच बडतर्फ करण्याची कारवाई सुरू केली. त्यानंतर ठाणे विभागातील कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होण्यास तयार झाले. त्यामुळे सुरुवातीला ठाणे विभागाकडून ठाणे- बोरिवली, ठाणे-पनवेल, ठाणे-भिवंडी, भिवंडी-कल्याण, कल्याण-वाडा, कल्याण-मुरबाड या मार्गावरील एसटीच्या स्थानिक पातळीवरील फेऱ्या सुरू केल्या. तरीही या गाडय़ा प्रवाशांसाठी अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. महामंडळाकडून मागील आठवडय़ात ठाणे विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने ५० चालक सेवेत रुजू केले. यामुळे स्थानिक फेऱ्यांबरोबर मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा देखील प्रवाशांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आल्या.

मागील आठवडय़ात ठाणे विभागातून स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या अशा एकूण ६९ गाडय़ा दिवसाला धावत होत्या. सद्य:स्थितीला ५० कंत्राटी चालक रुजू झाल्यामुळे त्यामध्ये आणखी २९ गाडय़ांची अधिक भर झाली असून एकूण ९८ गाडय़ांमधून दिवसाला सरासरी २५० फेऱ्या सुरू आहेत. यामध्ये १८५ स्थानिक फेऱ्या आणि ६५ लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचा समावेश आहे. 

दिवसाला १२ लाखांचे उत्पन्न

ठाणे- बोरिवली, ठाणे-भिवंडी, भिवंडी- कल्याण, ठाणे-पुणे या मार्गावरील फेऱ्यांमधून ठाणे विभागाला आठवडय़ापूर्वी दिवसाला साडेआठ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, सद्य:स्थितीला कंत्राटी चालकांची भरती केल्यामुळे या फेऱ्यांबरोबरच ठाण्याहून महाड, अलिबाग, जव्हार, सातारा, कराड, सोलापूर, कोल्हापूर, कवठेमहांकाळ, अक्कलकोट तर, कल्याणहून आळेफाटा, अहमदनगर, पुणे अशा लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाणे विभागाच्या तिजोरीत दिवसाला १२ लाखांच्या उत्पन्नाची भर पडत आहे. 

६० टक्के कर्मचारी रुजू

ठाणे विभागात चालक, वाहक, प्रशासकीय आणि कार्यशाळेतील असे एकूण २,७४३ कर्मचारी आहेत. त्यापैकी १६३४ कर्मचारी कामावर रुजू झाले असून उर्वरित १,१०९ कर्मचारी अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीत. त्याचबरोबर ठाणे विभागात आतापर्यंत ३१३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर, २८३ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St services thane division started some relief passengers ysh

ताज्या बातम्या