scorecardresearch

‘राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांवर कारवाई करावी’; ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांची मागणी

“महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात,” असे विधान बाबा रामदेव यांनी ठाण्यातील महिला संमेलन कार्यक्रमात बोलताना केले होते.

‘राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांवर कारवाई करावी’; ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांची मागणी
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी पक्षापाठोपाठ ठाणे शहर कॉंग्रेसचे सचिव तथा प्रवक्ते सचिन शिंदे यांनी रामदेव बाबावर राज्य महिला आयोगाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ७२ तासात दोन गुन्हे दाखल होतात आणि ते दोषी नसल्याचे दिसत असतानाही त्यांनी तत्काळ अटक केली जाते. मात्र इथे योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलाप्रंती वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात अद्यापही गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- ठाणे: रामदेव बाबा यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा; राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची मागणी

ठाण्यात हायलॅन्ड मैदानात योगशिबिर आणि महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान महिलांना मार्गदर्शन करताना रामदेव बाबा यांची जीभ घसरल्याचे दिसून आले. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सुटमध्येही त्या चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात.अशाप्रकारचे स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. महिला कार्यक्रमातच त्यांनी अशा पध्दतीचे विधान करणे अयोग्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यामुळे निश्चितच हे शोभनिय नसल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अवघ्या ७२ तासात दोन गुन्हे दाखल होतात आणि ते दोषी नसतानाही त्यांना अटक केली जाते. मात्र येथे रामदेव बाबा यांचा वादग्रस्त संभाषणाचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारीत होत स्त्रियांकडे विखारी नजरेने पाहण्याची कबुली दिल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ काय समजायचा?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- ठाणेकरांनो सावधान!; बसमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

महाराष्ट्र राज्यातील महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याच कार्यक्रमाच्या वेळेस मंचावर जो फलक लावण्यात आला होता. त्या फलकावर महाराष्ट्रातील कर्तत्वान महिला समाज सुधारकांच्या प्रतिमा दिसून येत आहेत. त्यामुळे रामदेव बाबा यांचे वक्तव्य हे निषेध करण्यासारखेच असून त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे, महिला आयोगाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 18:21 IST

संबंधित बातम्या