स्थानक परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळीनाका, घोडबंदर परिसरात बस्तान

ठाणे : महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला तसेच हिरानंदानी इस्टेट येथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देणे हे दोन्ही प्रकार ताजे असतानाही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठाणे शहरात पुन्हा फेरीवाल्यांनी त्यांचे बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाची तोंडदेखली कारवाई पुन्हा उघडी पडली आहे. 

शहरातील ठाणे रेल्वे स्थानक परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळीनाका, वागळे इस्टेट, घोडबंदर, पाचपाखाडी येथे पुन्हा फेरीवाल्यांची जत्रा भरू लागली आहे. या फेरीवाल्यांमुळे पदपथ, रस्ते अडले जात असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. विशेष म्हणजे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी टपऱ्या, हातगाड्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडल्या होत्या. त्याच ठिकाणी फेरीवाल्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत.

अनेक फेरीवाल्यांची दुकानेही शहरातील नगरसेवकांच्या कार्यालये, निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहेत. मात्र, या लोकप्रतिनिधींकडूनही फेरीवाल्यांविरोधात भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

ठाणे महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांना याबाबत विचारले असता महापालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यापुढेही ती सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त गर्दी

दिवाळीच्या हंगामात ठाण्यातील रस्त्यांवर फेरीवाल्यांचे भरणारे जथ्थे ठाणेकरांना नवे नाहीत. मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमधून अनेक फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात येऊन व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांकडून खरेदीसाठी नागरिकांचीही मोठी गर्दी होत असते. दिवाळी जवळ आल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्थानक परिसरातील फेरीवाल्यांकडे जाणूनबुजून कानाडोळा केल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. हा काळ खरेदी- विक्रीसाठी पोषक असल्याने सामान्यांसाठी फेरीवाल्यांवर कारवाई करायची नाही, असा मतप्रवाह महापालिका वर्तुळात असल्याची चर्चा आहे.