कल्याण– कल्याण डोंबिवलीतील एकूण सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या ८० चोऱ्यांचा तपास करुन पोलिसांनी एक कोटी ५० लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता. जप्त ऐवज आणि तक्रारदार यांची ओळख पटवून मूळ तक्रारदारांना जप्त केलेला सोने, चांदी, रोख असा किमती ऐवज बुधवारी येथील एका कार्यक्रमात परत करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त पोलिसांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे दर्शन पोलिसांनी घडविले आहे. कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या उपस्थितीत ऐवज वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तक्रारदार नागरिक, नातेवाईक उपस्थित होते. कल्याण पश्चिमेतील वायले नगर येथील श्री साई सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता.

डोंबिवली हद्दीत चोरी, दरोडा, फसवणूक, घरफोडी अशा प्रकारचे एकूण ३३ गुन्हे गेल्या काही महिन्यापू्वी घडले होते. टिळकनगर, विष्णुनगर, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत याप्रकरणी तक्रारी दाखल होताच, पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी विशेष पथके तयार करुन या गुन्ह्यांचा तपास केला होता. आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा एक कोटी नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

कल्याण विभागात एकूण ४७ चोरीच्या घटना घडल्या होत्या. महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाणे, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदारांनी तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. कल्याण विभागातील तक्रारदारांना ४१ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज परत करण्यात आला.

या कार्यक्रमाला विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने, खडकपाडा ठाण्याचे सर्जेराव पाटील, बाजारपेठ ठाण्याचे नरेंद्र पवार, कोळसेवाडीचे बशीर शेख, टिळकनगरचे अजय आफळे, रामनगरचे सचिन सांडभोर, मानपाडाचे शेखर बागडे उपस्थित होते. ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंग यांच्या आदेशावरुन विशेष तपास पथके तयार करुन पोलिसांनी या गुन्ह्यांची उकल केली आहे.