मजबुतीसाठी रस्त्यांवर पोलादी ‘थर’

डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करूनदेखील दरवर्षी पावसाळय़ात रस्त्यांवर खड्डे पडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर रस्ते मजबूत करण्यासाठी त्यावर पोलादी मुलामा चढवण्याचा विचार राज्य सरकारने चालवला

डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करूनदेखील दरवर्षी पावसाळय़ात रस्त्यांवर खड्डे पडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर रस्ते मजबूत करण्यासाठी त्यावर पोलादी मुलामा चढवण्याचा विचार राज्य सरकारने चालवला आहे. पोलाद निर्मिती उद्योगातून निर्माण होणारी धातूची मळी बांधकाम साहित्यात मिसळून रस्ता उभारण्याचे जगभर प्रचलित असलेले तंत्र महाराष्ट्रातही अमलात आणण्यात येणार असून या धर्तीवर रायगड जिल्ह्यात सप्टेंबरपासून रस्ता बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया सरकारचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा पुरस्कार मिळालेले मूळचे ठाणेकर डॉ. विजय जोशी यांनी रस्त्यांचे ‘पोलादीकरण’ करण्याची ही कल्पना मांडली असून याकामी राज्य सरकारला सहकार्य करण्याचेही मान्य केले आहे.

पोलाद निर्मितीनंतर निर्माण होणारी मळी रस्ते बांधणीत वापरल्यास रस्ते मजबूत होतात. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील अनेक देशांत या तंत्राचा अवलंब केला जातो. हीच बाब डॉ. विजय जोशी यांनी अलीकडेच ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मांडली. जोशी हे काही कामानिमित्त ठाण्यात आले असताना ही बैठक झाली. त्यानुसार हे तंत्र वापरून प्रायोगिक तत्त्वावर रायगडमधील इस्पात कंपनीजवळील रस्ता उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या डांबरीकरण झालेले रस्ते धड वर्षभरही टिकत नाहीत. काँक्रिटीकरण झालेले रस्ते किमान दहा वर्षे टिकणे अपेक्षित असले तरी त्याआधीच ते उखडत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच आता यात पोलादी मिश्रण वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पोलादी मळीचा वापर का?
* रस्त्यांचे आर्युमान वाढते. शिवाय रस्त्याला भेगा पडण्याचे प्रमाणही घटते.
* पोलादी मळीतील ‘मायक्रोपोरस’मध्ये चिकटतेचे गुणधर्म असतात. त्यामुळे ते संपूर्ण मिश्रण एकसंध ठेवतात.
* पोलादी मळी मजबूत असल्याने कितीही भार पेलू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Steel layer for road to stop potholes

ताज्या बातम्या