कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा समावेश

ठाणे : लशीचा साठा संपल्यामुळे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रे मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. ठाणे जिल्हा आरोग्य विभागाला बुधवारी ६६ हजार लसकुप्यांचा साठा उपलब्ध झाला असून हा साठाही केवळ दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग कसा येईल, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

जिल्ह्य़ात मागील काही दिवसांपासून लशीच्या तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार खंड पडत आहे. मागील आठवडय़ात जिल्ह्याला दीड लाख लसकुप्यांचा साठा मिळाला त्यानुसार, लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग आल्याचे चित्र होते. परंतु ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरातील हा साठाही संपल्यामुळे ठाणे शहरात मंगळवार आणि बुधवारी सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. तर, कल्याण-डोंबिवली शहरातही सोमवार आणि मंगळवार लसीकरण केंद्रे बंद होती. कल्याण-डोंबिवली शहरात बुधवारी केवळ दोन लसीकरण केंद्रे सुरू होती. जिल्ह्य़ात लशीची पहिली आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या मोठी असून या नागरिकांची लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होते. लस मिळावी यासाठी नागरिक पहाटे तीन वाजल्यापासून रांगा लावत आहेत. परंतु केंद्रांवर पुरेसा लससाठा नसल्यामुळे अनेकांना लसविनाच माघारी परतावे लागत आहे. यामुळे अनेकदा लसीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थती निर्माण होत असून नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्य़ाला बुधवारी ६६ हजार लसकुप्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये ३३ हजार कोव्हॅक्सिन आणि ३३ हजार कोव्हिशिल्डचा समावेश आहे. हा साठाही अवघे दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच असल्याने लसीकरण मोहिमेला वेग कसा येईल, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.