ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागातील धक्कादायक प्रकार
भिवंडीतील एका गोदामातून चोरीस गेलेले नामांकित कंपनीचे महागडे मोबाइल ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागामधील काही वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी वापरत असल्याची धक्कादायक माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तपासादरम्यान पुढे आली आहे. या प्रकरणामुळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्याने पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे, ही चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे.
भिवंडी येथील वालशिंद गावाजवळील एका गोदामातून एका नामांकित कंपनीचे चारशे महागडे मोबाइल चोरीला गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या मोबाइलची एकत्रित किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे चोरटय़ांच्या शोधासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांची पथके तयार करण्यात आली. हा तपास सुरू असतानाच ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली. हा तपास भिवंडी तालुका पोलीस करत असल्याने आरोपी व जप्त केलेले १२४ मोबाइल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपीच्या चौकशीनंतर पोलिसांनी अन्य तीन आरोपींना अटकही केली.
चोरांचा छडा लागल्यानंतर पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यास सुरुवात केली. या मोबाइलच्या ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच यापैकी काही मोबाइल ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेतील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वापरात असल्याचे उघड झाले. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर त्यासंदर्भात पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर सिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र ही चौकशी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. त्यामुळे ती कितपत तथ्यपूर्ण होईल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

वादग्रस्त गुन्हे अन्वेषण विभाग
गेल्या काही वर्षांत गुन्हे शाखेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. असे असतानाच आता पुन्हा चोरीचे मोबाइल वापरण्याचे प्रकरण पुढे आले आहे. पोलीस उपायुक्त मणेरे यांच्या कार्यकाळातच ही सर्व प्रकरणे घडली आहेत.

भिवंडीतील गोदामातून चोरीस गेलेले मोबाइल ठाणे पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी वापरत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. त्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांना सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी प्रकरणे संबंधित विभागाच्या प्रमुखांमार्फतच करण्यात येते, त्यानुसारच त्यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे. – परमवीर सिंग, ठाणे पोलीस आयुक्त