कारगिल नगरात दगड हल्ले

गेल्या महिनाभरापासून असा प्रकार घडत असून मध्यरात्रीपासून दगडफेकीचा प्रकार सुरू आहे.

दगडफेकीमुळे कारगिल नगरमधील अनेक घरांचे पत्रे फुटले आहेत.

चाळींतील घरांवर अज्ञातांकडून दगडफेक; पोलिसांकडून कारवाई नाही

विरारच्या कारगिल नगर येथील चाळींवर गेल्या काही दिवसांपासून रात्री अज्ञातांकडून दगडफेक करण्यात येत आहेत. ही दगडफेक कोण करत आहेत, ते समजलेले नाही, मात्र येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. पोलिसांकडे याबाबत तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

कारगिल नगरमध्ये मोठय़ा संख्येने चाळी असून त्या ठिकाणी २०० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र काही दिवसांपासून होत असलेल्या या दगडफेकीच्या प्रकारामुळे नागरिक घाबरून गेले आहेत. रात्री उशिरा घरी परतणारे नागरिक त्यामुळे अधिक भयभीत झाले असून दगडफेक कोण करत आहेत, ते अद्याप समजले नाही.

गेल्या महिनाभरापासून असा प्रकार घडत असून मध्यरात्रीपासून दगडफेकीचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे फुटून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दगडफेकींमुळे शारीरिक इजा होऊ  नये यासाठी अनेकांनी

आपल्या घराच्या छताला चादरी व चिकटपट्टी लावून ठेवल्या आहेत. दगडफेकीमुळे कोणत्याही क्षणी पत्रा फुटून दगड डोक्यात पडू शकतो. घरात लहान मुले, वयोवृद्ध नागरिक असल्याने जीव मुठीत धरून रात्रभर जागे राहावे लागत आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.

विरार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. येथील नागरिकच काही दिवसांपासून परिसरात गस्त घालत आहेत.

भूमाफियांवर संशय

कारगिल नगर परिसरात भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून त्यांनी चाळीतील घरे विकण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे दगडफेक करून त्यांना हुसकावून लावण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

३१ ऑक्टोबरच्या रात्री मला याबाबत दूरध्वनी आला होता. त्यानुसार तातडीने जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली. या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी देखील पाठवण्यास सुरुवात केली आहे, तसेच या दगडफेकीमधील कोणतेच कारण पुढे आलेले नाही. याबाबत आमचा तपास सुरू आहे. जर कोणी सापडला तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

– घनश्याम आढव, पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Stone attacks in virar