पालिका आयुक्तांकडून नगरसेवकांची कानउघाडणी
ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या मुद्यावर प्रत्येक वेळी महापालिका प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना मंगळवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खडेबोल सुनावले. ‘महापालिका प्रशासन निर्बुद्ध आहे, आम्हाला कसल्याच गोष्टीचे ज्ञान नाही. तरीही आम्ही शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहवाल करत आहोत,’ अशी उपरोधिक विधाने करतानाच ‘समूह पुनर्विकासासारखी मोठी योजना राबवायची असेल तर एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा ठोस कामे करावी लागतील,’ अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली.
ठाणे शहरातील बेकायदा तसेच धोकादायक इमारती व चाळींच्या सामूहिक पुनर्विकासाकरिता महापालिका प्रशासनाने पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामांचा (इम्पॅक्ट असेसेमेंट) अहवाल तयार केला असून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालाची प्रत विरोधी पक्षाला अद्याप देण्यात आलेली नाही. या मुद्यावर मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रत देण्यात आलेली नसल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी केला होता. त्यावर ‘मग याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रांत कशा येतात,’ असा सवाल करत सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जयस्वाल यांनी प्रशासनाची भूमिका मांडली. ‘महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या पायाभूत सुविधांवरील परिणामांच्या अहवालात राज्य शासन काही सूचनांचा समावेश करणार असून त्यासाठी पुढील आठवडय़ात बैठक होणार आहे. त्यानंतरच हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल सार्वजनिक दस्तावेज केला तर माहिती अधिकारात त्याची कोणीही मागणी करू शकते. त्यामुळे हा अहवाल सार्वजनिक दस्तावेज करावा की नाही, याचा अद्याप निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘राज्यात अशा स्वरूपाचा अहवाल सादर करणारी ही पहिली महापालिका असल्याचा दावा करत प्रशासनाचे कौतुक करणे गरजेचे होते. पण, तसेच करण्याऐवजी येथे आम्हाला अहवाल मिळाला नाही म्हणून यावर चर्चा करण्यात येते, याची खंत वाटते. वृत्तपत्रात मीच बातमी दिली, पण अहवाल दिला नाही. त्यामुळे माहिती देणे आणि अहवाल देणे यात काय फरक असतो, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ‘वैयक्तिक स्वरूपात सभागृह चालवायचे आणि कुणाचे ऐकायचे नाही, हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. तसेच आयुक्तांनी आम्हाला विचारल्याशिवाय बोलायचे नाही, असा काही फतवा किंवा ठराव करायचा असेल तर करा. मला त्याचा काहीही फरक पडणार नाही. सभागृहात केवळ प्रशासनाला निवेदन करताना सर्व र्निबध पण, नगरसेवकांनी कितीही वेळ बोलेले तरी चालते हे योग्य नाही, असे जयस्वाल यावेळी म्हणाले.