tvlogसाधारण बारा-तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट! आमच्या आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेमध्ये स्किझोफ्रेनिया नावाच्या एका गंभीर मानसिक आजाराने आजारी असलेल्या रुग्णांच्या म्हणजेच ‘शुभार्थी’च्या घरच्या लोकांसाठी म्हणजेच ‘शुभंकरां’साठी एक प्रशिक्षण कार्यक्रम घ्यायचे ठरले. निमित्त होते मी करत असलेल्या पीएच.डी. संशोधन प्रकल्पाचे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आयपीएचचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. शुभा थत्ते आणि माझ्या मार्गदर्शक डॉ. अनुराधा सोवनी यांनी मदत केली होती. रुग्णाच्या कुटुंबीयांना (शुभंकरांना) रोज रुग्णाबरोबर (शुभार्थी) वावरताना येत असलेला ताण, रुग्णाच्या वर्तनाबद्दलच्या समस्या आणि मुख्यत: समाजात वावरताना वाटणारा कलंक यासारख्या विषयांवर आधारित सत्रांची आखणी केली होती. या कार्यक्रमाचा लाभ जवळजवळ ७० ते ७५ शुभंकरांनी घेतला. या सत्रांना येताना ते थोडे बावरलेले असायचे. पण हळूहळू नियमित येत राहिल्यामुळे एकमेकांशी ओळखी झाल्या. एका गटामध्ये साधारण पाच-सहा शुभंकर असायचे. एका गटाबरोबर दोन तासांची सहा सत्रे घेतली गेली. एकमेकांबरोबर बोलणे, मन मोकळे करणे, यामुळे एकमेकांचा आधार वाटायला लागला. काही शुभंकरांनी अशी इच्छा व्यक्त केली की, प्रशिक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेल्या आमच्या भेटी या सहा सत्रांपुरत्याच मर्यादित राहू नयेत. भविष्यामध्येसुद्धा आम्हाला एकमेकांना भेटण्याची संधी मिळावी. आमच्यासाठी आता हे आठवडय़ातून एकदा भेटणे खूप काही देऊन जाते, तर निदान महिन्यातून एकदा भेटण्याची सोय तरी आयपीएचमध्ये करावी. आम्ही सर्वानी लगेच सूत्रे हलवली आणि महिन्यातून एकदा भेटायचे निश्चित केले. आयपीएचमध्ये शुभंकरांच्या स्वमदत गटाची, ‘सुहृद’ची, स्थापना झाली ती अशी. सुहृद म्हणजे जी दुसऱ्याच्या मनातील भावना समजून घेऊ शकते अशी कोणतीही व्यक्ती. या स्वमदत गटात तर एका नावेतून जाणारे सर्व शुभंकर होते. त्या दिवसापासून एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याचा एक अविरत प्रवास सुरू झाला.
सुहृदच्या मीटिंगमध्ये अनेक महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांची चर्चा होत असते. कधी शुभार्थीनी औषध घ्यायला नकार दिला तर काय करायचे यावर, लग्नाचे वय झाले आहे पण प्रत्यक्ष लग्न करण्याची परिस्थिती नाही तर कसे समजावयाचे यावर, तर स्वत:वर येणाऱ्या वेगवेगळ्या ताणांबद्दल चर्चा, तर कधी कुटुंबातील इतर सदस्यांच्या असहकारामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मन मोकळे करणे. आम्ही सगळे या प्रवासात एकमेकांपासून खूप काही शिकत आहोत. सुहृद स्वमदत गटाला येणाऱ्या शुभंकरांमध्ये काही जण गेली दहा वर्षे सातत्याने येत आहेत. काही सदस्य अधूनमधून येतात. कोणालाही नियमित येण्याचे बंधन नाही. जेव्हा पहिल्यांदा शुभंकर येतात तेव्हा त्यांना आपल्याबद्दल आणि आपल्या शुभार्थीबद्दल बोलायची संधी दिली जाते. आम्ही सर्व जण समजावून घेतो की, त्यांची नक्की समस्या काय आहे. जुने शुभंकर आपले अनुभव सांगतात. त्यातूनही खूप शिकायला मिळते. प्रत्येकाने दुसऱ्याचा केलेला विनाअट स्वीकार हीच या स्वमदत गटाची ताकद आहे.
या स्वमदत गटात यशाचे महत्त्वाचे कारण त्याच्या बांधणीमध्ये आहे. असा गट असावा याची गरज शुभंकरांना वाटली आणि त्यांनी एकत्र येऊन हा गट स्थापन केला. या गटाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या गटात स्वयंसेवी शुभंकर अर्थात स्वयंसेवक ज्याच्या घरी कोणालाही कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार नाही, पण त्यांना अशा रुग्णांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून आस्था आहे. हे स्वयंसेवी शुभंकर प्रामुख्याने आमच्या त्रिदल या शुभार्थीच्या त्रिदल नावाच्या कार्यशाळेत सेवा देण्यासाठी येतात आणि मग सुहृदचे सभासद बनतात.  रुग्णाचे शुभंकर आणि स्वयंसेवी शुभंकर या दोघांच्या मैत्रीमुळेच हा स्वमदत गट दिवसेंदिवस सुदृढ होत आहे.
(सुहृद गटाची सभा महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात येते. सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. स्थळ- आयपीएच, ९ वा मजला, गणेश दर्शन टॉवर्स, हरी निवास सर्कल, नौपाडा, ठाणे.) माहितीसाठी संपर्क –
अस्मिता- ९७६९८०३१४०, मीरा- ९७६६०३१९५०