ठाण्यातील माजीवडा भागातील एका उच्चभ्रू गृहसंकुलात एका व्यक्तीने संकुलाच्या अध्यक्षांच्या अंगावर भटक्या श्वानांना सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्वानांच्या चाव्यामुळे संकुलाचे अध्यक्ष जखमी झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संकुलात भटक्या श्वानांना अन्नपदार्थ खाऊ घालण्यावरून संबंधित व्यक्ती आणि संकुलाच्या अध्यक्षामध्ये वाद सुरू आहेत. त्यावरून हा प्रकार घडला असून याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माजीवडा येथे एक उच्चभ्रू गृहसंकुल आहे. या संकुलात राहणारे एक दाम्पत्य भटक्या श्वानांना संकुलाच्या प्रवेशद्वारावर तसेच आवारात अन्नपदार्थ खाऊ घालत असतात. यासंदर्भातील तक्रार संकुलातील रहिवांशांनी अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर श्वानांना अन्नपदार्थ टाकू नयेत अशा सूचना संबंधित दाम्पत्यास करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही दाम्पत्याकडून श्नानांना अन्नपदार्थ खाऊ घालणे सुरूच होते.

सोमवारी रात्री संकुलाचे अध्यक्ष परिसरात फेरफटका मारत असताना संबंधित व्यक्ती ८ ते १० श्वानांना अन्नपदार्थ खाऊ घालत होते. त्याचवेळी त्या व्यक्तीने संकुलाच्या अध्यक्षांच्या दिशेने हाताचा इशारा करताच चार श्वानांनी त्यांच्यांवर हल्ला केला. यातील दोन श्वानांनी त्यांच्या पायाचा चावा घेतला. संकुलातील इतर रहिवाशांनी या श्वानांना हुसकावले. त्यानंतर अध्यक्षांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर हा गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.