सकाळी दिवे बंद करण्याचा कर्मचाऱ्यांना विसर; सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर
कल्याण-डोंबिवली महापालिकेने शिळफाटा रस्त्यासह २७ गावांमध्ये प्रखर झोताचे हायमास्ट दिवे बसविण्याची कामे विद्युत ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू केली आहेत. विजेच्या खांबावर प्रखर झोत दिवे बसून झाल्यानंतर ते तसेच चालू ठेवून कामगार पुढे निघून जात आहेत. दिवे चालू झाल्यानंतर ते बंद कोणी आणि कसे करायचे याचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याचे चित्र या भागात दिसत आहे. काटई, शिळफाटा भागात सलग ३६ तास दिवे सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
वीज, पाणी बचत करा म्हणून महावितरण कंपनी, महापालिका एकीकडे अभियान राबवीत असताना महापालिकेचा विद्युत विभाग आणि तेथील विद्युत ठेकेदार विजेचा अपव्यय करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. काटई, निळजे, कोळे भागातील ग्रामस्थांनी यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शिळफाटा मुख्य रस्ता, काटई, निळजे परिसरात महापालिकेने पंधरा वर्षांपूर्वी वीज दिव्यांसाठी खांब बसविले होते. गावे वगळल्यानंतर हे खांब दिव्याविना उभे होते. गावे पालिकेत आल्यानंतर या भागातील पथदिव्यांची कामे पालिकेने हाती घेतली आहेत.
एका खासगी विद्युत ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. हा ठेकेदार स्थानिक असल्याचे सांगण्यात येते. या ठेकेदाराचे कामगार पथदिव्यांच्या खांबावर प्रखर झोताचा दिवा बसवून देतात. दिव्यांची तपासणी केल्यावर ते बंद करण्याची तसदी घेतली जात नसल्याचे या भागातील काही ग्रामस्थांनी सांगितले. रात्रीच्या वेळेत या दिव्यांचा उजेड छान वाटतो. पण दिवसाही हे प्रखर झोताचे दिवे चालू राहत असल्याने ग्रामस्थ विजेची हानी होत असल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दिव्यांबाबत आपण महापालिकेकडे तक्रारी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण कोणीही आपणास माहिती देण्यास तयार नाही. एकमेकांची नावे सांगून संपर्क साधण्यास सांगितले जाते, असे संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात विद्युत विभागाचे राजेंद्र कु ऱ्हेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अशा प्रकारे विजेचे दिवे सुरू असतील तर ते तातडीने बंद करण्यासाठी तेथे कर्मचारी पाठविण्यात येईल, असे सांगितले.