scorecardresearch

ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी , नाराजीच्या वातावरणात खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले असते तर पुन्हा जिल्ह्यावर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले असते.

ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी , नाराजीच्या वातावरणात खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी , नाराजीच्या वातावरणात खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे डोंबिवलीचे भाजप आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ठाणे जिल्हा पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री पदी सातारचे आ. शंभुराज देसाई यांची निवड करण्यात आल्याने, ठाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी साताऱ्याला जायाचे का, असे प्रश्न भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावूनही मंत्री चव्हाण यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद न देता पालघर, सिंधुदुर्ग अशा दोन टोकाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्याने हेतुपुरस्सर त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला आहे, अशी टीका भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याविषयावर भाजप मधील एकही नेता, पदाधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. मंत्री चव्हाण, त्यांच्या स्वीय साहाय्यकांना यासंदर्भात संपर्क केला. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा : डोंबिवलीत भाजपाचा नमो रमो नवरात्रोत्सव; सावळाराम महाराज क्रीडासंकुलात उभारणार मंदिरांच्या भव्य प्रतिकृती

मंत्री चव्हाण यांच्या खास समर्थक पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की पालकमंत्री नियुक्ती हा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करुनच घेतला असेल. त्यामुळे या विषयी आम्ही उघडपणे बोलू शकत नाहीत. मात्र ठाणे जिल्हा हा शिवसेनेला पहिल्यापासून बालेकिल्ला आहे. या किल्यावरील आपले वर्चस्व अबाधित राहावे असे त्यांना वाटणे सहाजिकच आहे.त्यामुळे मंत्री चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले असले तरी कोणत्याही नेत्याला एक सुप्त भीती प्रतिस्पर्धी नेत्या विषयी नेहमीच वाटत असते. तेच या नियुक्तीमध्ये झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले असते तर पुन्हा जिल्ह्यावर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले असते. जिल्ह्यातील २३ आमदारांशी नियमित संपर्क आला असता. मुख्यमंत्री पद मिळवून देणारा हा जिल्हा आहे. मंत्री चव्हाण यांची राजकीय ताकद आणि हाताळणी सर्वश्रृत असल्यामुळेच त्यांना ठाणे जिल्ह्या पासून दूर उत्तर आणि दक्षिण दोन टोकाचे जिल्हे देऊन त्यांना त्या भागात व्सस्त ठेवण्याचा प्रयत्न या नियुक्तीमधून करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाणे शहरात आजपासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाला सुरुवात

मंत्री चव्हाण हे जिद्दी आणि न बोलता काम करणारे असल्याने ते दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील. त्याच बरोबर आपल्या मतदारसंघात योग्यरितीने काम करतील. त्यासाठी त्यांना पालकमंत्री पदाची गरज नाही. स्वता ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. अन्न व पुरवठा मंत्री आहेत. या माध्यमातून त्यांना ठाणे काय राज्यात विविध कामे, योजना राबविण्याची संधी आहे त्याचा सदुपयोग ते करुन घेतील, असे या निष्ठावान कार्यकर्त्याने सांगितले.भाजपचे डोंबिवलीतील आयरे प्रभागाचे नगरसेवक मंदार टावरे यांनी समाज माध्यमात व्यक्त होताना म्हटले आहे, की ‘ठाणे जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आता साताऱ्याला जायचे का. मिस्टर गुवाहटी काही तरी सोडा भूमिपुत्रांना सोेडा. अन्यथा अस्मितेसाठी परत लढावे लागेल आम्हाला.’मंत्री चव्हाण ठाण्याचे पालकमंत्री झाले की विविध प्रकारचा विकास निधी आपणास उपलब्ध होईल. जिल्ह्यात झटपट विकास कामे मार्गी लागतील अशी गणिते पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होती. त्यांचा हिरमोड झाला आहे.

खा. शिंदे-फडणवीस भेट

रविवारपासून डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात मंत्री चव्हाण यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी सकाळी भेट घेतली. त्यांना डोंबिवलीतील शिवसेनेच्या नवरात्रोत्सवाचे आमंत्रण दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्सवाला येण्याचे आश्वासन खा. शिंदे यांना दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश मोरे, शहरप्रमुख राजेश मोरे, रवी पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या