वरिष्ठांचा दबावातून विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याची वडिलांची तक्रार
कल्याण – मध्य रेल्वेतील वरिष्ठांबरोबर असलेल्या प्रशासकीय कामातील वादातून कल्याण पश्चिमेतील सेंट्रल रेल्वे शाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या आठ वर्षाच्या मुलाला मारहाण होत असल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी दोन शिक्षिकांविरुध्द शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मारहाण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे वडील विनोद धुरंधर हे कुटुंबीयांसह उल्हासनगर येथे राहतात. ते मध्य रेल्वेमध्ये वरिष्ठ विभागीय अभियंता (टेलिकाॅम) आहेत. ते रेल्वेच्या कल्याण कार्यालयात काम करतात. त्यांचा आठ वर्षाचा मुलगा सेंट्रल रेल्वे शाळेत शिक्षण घेत आहे. विनोद धुरंदर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मध्य रेल्वेचे वरिष्ठ कार्मिक अधिकारी हे सेंट्रल रेल्वे शाळेचे अध्यक्ष असतात.
चार वर्षापूर्वी शाळेचे वरिष्ठ अधिकारी आणि अध्यक्ष यांनी आपल्या कार्यालयीन चक्राकार गैरहजेरीत गैरप्रकार करून आपले वेतन बंद केले. याप्रकरणी आपण राष्ट्रीय अनुचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केली होती. ही तक्रार मागे घ्यावी म्हणून शाळेचे दोन्ही वरिष्ठ आपल्यावर दबाव टाकत होते. आपण तक्रार मागे घेतली नाही. या प्रकरणात आपणास न्याय मिळाला.
सेंट्रल रेल्वे शाळेत आपले वरिष्ठ डाॅ. ए. के. सिन्हा यांनी सध्याच्या प्राचार्य ज्योती श्रीवास्तव यांची नियुक्ती केली आहे. त्या काही ना कारणाने आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी सप्टेंंबरमध्ये सेंट्रल रेल्वे शाळेतील आपल्या आठ वर्षाच्या मुलाला रोहिणी तिवारी नावाच्या शिक्षिकेने मारहाण केली होती. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्येही रोहिणी शिक्षिकेने आपल्या मुलाच्या डोक्यावर हाताने मारले. केस ओढून, कानाला धरून त्याला बाकड्यातून खेचून शिक्षा म्हणून जमिनीवर बसवले होते.
याप्रकरणी आपण राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. प्राचार्य श्रीवास्तव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. १ मार्च रोजी प्रज्ञा कदम या शिक्षिकेने आपल्या अल्पवयीन मुलाला हाताच्या चापटीने पाठीवर मारहाण केली. त्यावेळी कदम यांना जाब विचारल्यावर त्यांनी मारण्याचे कारण न सांगता याप्रकरणात आपली दिलगिरी व्यक्त केली होती.
मुलाला शाळेत शिक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीमुळे मुलगा घाबरला आहे. तो शाळेत जाण्यास तयार होत नाही. त्याचे शालेय भवितव्य धोक्यात आले आहे. आपण जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या समन्वय अधिकारी श्रध्दा नारकर यांच्याकडे तक्रार केली. नारकर यांनी आपल्या मुलाची विचारपूस केली. त्यांच्यासह आपण पोलीस ठाण्यात हजर होऊन सेंट्रल रेल्वे शाळेतील शिक्षिका रोहिणी तिवारी, प्रज्ञा कदम यांच्या विरुध्द अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण, बाल हक्क संरक्षण कायद्याने तक्रार करत आहोत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या बातमी संदर्भाच्या अधिक माहितीसाठी मध्य रेल्वे सेंट्रल शाळेच्या प्राचार्य ज्योती श्रीवास्तव यांना मोबाईल वरून सतत संपर्क केला. लघु संदेश पाठवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिला नाही. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्निल नीला यांना लघु संदेश पाठवून प्रत्यक्ष संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.