विज्ञानाचे बाळकडू : तारकांच्या जन्मरहस्याचा संशोधक

‘आकाश दर्शन’ हा सर्वसाधारणपणे आपल्या सर्वाचाच एक कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. आकाशातील तारकांचे आणि ग्रहांचे नियमित आणि अनियमित भ्रमण आपल्याला अचंबित करून टाकत असते.

‘आकाश दर्शन’ हा सर्वसाधारणपणे आपल्या सर्वाचाच एक कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. आकाशातील तारकांचे आणि ग्रहांचे नियमित आणि अनियमित भ्रमण आपल्याला अचंबित करून टाकत असते. ‘आकाश दर्शना’चे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतूहलाचे रूपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थाना शालेय वर्षांतच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे.
tv01गुरुराजची आई शीला वागळे म्हणजेच वागळेबाई नौपाडय़ात गेली पंचवीस वर्षे बालवाडी चालवीत आहेत. शालेय वयात आईकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे गुरुराजला विज्ञान आणि गणिताची गोडी लागली. या विषयातील बाह्य़ परीक्षेत गुरुराजने नेहमीच चांगले यश मिळवले. बाल वैज्ञानिक परीक्षेत गुरुराज सहावीत सुवर्णपदकाचा मानकरी होता आणि नववीत त्याला रजतपदक मिळाले होते. याच दिवसात गुरुराज ‘आकाश दर्शना’च्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. शाळेच्या ग्रंथालयातील खगोलशास्त्राची पुस्तके वाचून त्याला या विषयाची गोडी लागली व याच विषयात करिअर करावयाचे अशी ईष्र्या पण मनात निर्माण झाली. अकरावीत गुरुराजने मुंबई विद्यापीठचा बहि:शाळा विभागाचा खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरचा प्रगत अभ्यासक्रम महाविद्यालयात असताना पूर्ण केला.
मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून २००५ साली भौतिकशास्त्रातील पदवी ऑनर्ससहित मिळवून त्याने मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील भौतिकशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तत्पूर्वी २००४ साली शुक्र ग्रहाचे सूर्यावर अधिक्रमण होण्याचा योग आला होता. जिज्ञासा ट्रस्टचा प्रतिनिधी म्हणून गुरुराज नेहरू तारांगण येथील अभ्यास शिबिरात सहभागी झाला होता. त्यानंतर प्रत्यक्ष अधिक्रमणाच्या दिवशी त्याने जिज्ञासा ट्रस्टच्या विशेष कार्यक्रमात दुर्बणिीच्या साहाय्याने शालेय विद्यार्थाना हा विषय अगदी सोप्या रीतीने समजावून सांगितला होता.
२००६ च्या उन्हाळी सुट्टीत त्याला टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील बाहेरील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संशोधन अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्राध्यापक मयांक वाहय़ा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरू ग्रहावर वास्तव्याची शक्यता’ या विषयावर त्याने प्रकल्प केला होता.
अमेरिकेतील, केंटकी लेकझिंग्टन विद्यापीठातून, गुरुराजने पी.एचडी. पूर्ण केली. गुरुराजचा पी.एचडी. प्रबंधाचा  ‘आंतरतारका माध्यम’  [nterstellar medium]  हा  विषय भौतिकी खगोलशास्त्राशी [Astrophysics] संबंधित आहे.
या विषयासंदर्भात समजून घेण्याअगोदर भौतिक खगोलशास्त्राची धावती ओळख करून घेणे आवश्यक आहे. आकाशदर्शन ते भौतिकी खगोलशास्त्र हा अतिशय प्रचंड मोठा आवाका आहे. मानवाच्या नसíगक जिज्ञासूवृत्तीमुळे रात्रीच्या वेळी अथांग आणि अनंत आकाशाचा वेध घेण्याचा छंद मानवाला लागला. या छंदाला निरीक्षणाची आणि नोंदींची जोड देत मानवाने त्याचे शास्त्र निर्माण केले. या शास्त्रालाच खगोलशास्त्र नाव दिले गेले. ग्रह तारे यांचा अभ्यास करताना गॅलेलिओने लावलेल्या दुर्बणिीच्या शोधामुळे आणि नंतर न्यूटनने लावलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधामुळे भौतिकशास्त्राची जोड खगोलशास्त्राला मिळाली. इथूनच खगोल संशोधनाला जोमाने सुरुवात झाली. भौतिकशास्त्रातील विविध शोधांचा आणि नियमांचा आधार घेत मानवाने विश्वाला जाणून घेण्याचा शोध चालू ठेवला. आपली सूर्य ग्रह मालिका एका दीíघकेचा भाग आहे हे जाणून घेतल्यावर या दीíघकेपलीकडे देवयानी नावाची दुसरी दीíघका आहे हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस शास्त्रज्ञांना समजले. या अनंताचा शोध घेताना मुळात विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि तारकांचा जन्म आणि मृत्यू कसा होतो याचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेतच.
 ‘आकाशदर्शन’ करताना मृग नक्षत्रामध्ये अभ्रिका दाखवली जाते.. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ही अभ्रिका अंधाऱ्या रात्री चांगल्या दुर्बणिीने स्पष्ट दिसू शकते. ही अभ्रिका तारकांचे जन्मस्थान आहे. या तेजोमेघातील वायूंचा अभ्यास हा गुरुराजचा पी.एचडी.चा संशोधनाचा विषय होता.. नेब्युलाबरोबरच ‘गुरुराजने ‘पोलेरीस फ्लेअर’ नावाच्या परमाणुमेघाचा ( molecular cloud )चा अभ्यास पण पी.एचडी. करताना केला. या मेघामध्ये अजून तारकानिर्मिती सुरू झाली नाही.
‘आंतरतारका माध्यम’ याला डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘तारकादरम्यान’ हा शब्द वापरला आहे. ही अवकाशातील पोकळी नसून तिथे प्रामुख्याने म्हणजे ९९ टक्के वायू आणि १ टक्का विविध धातूंच्या अतिसूक्ष्म कणाची धूळ असते. वायूच्या वस्तुमानातील हायड्रोजन हा ७५% असतो आणि उरलेला २५% हेलियम वायू असतो. इथेच तारकांची निर्मिती होते. या वायूत अणू परमाणूबरोबर कार्बन आयर्न आणि सिलिकॉनचे कण असतात. या वायूची घनता अतिशय कमी असते. तारकांचा जन्म-मृत्यू प्रक्रिया अनेक अब्जावधी वर्षांची असते.
गुरुराज अमेरिकेहून परत येऊन सध्या डॉ. जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील आयुका संस्थेत एका प्रकल्पावर संशोधक म्हणून कार्यरत आहे. खगोलीय संशोधन का आणि कशा करता करायचे, असे प्रश्न विचारणे वेडेपणाचे आहे. जोपर्यंत मानवाच्या मनात जिज्ञासूवृत्ती आहे तोपर्यंत माणूस अशा प्रकारे अनंताचा वेध घेत राहणारच. गुरुराजचे विशेष कौतुक करावयाचे कारण, ब्रेन ड्रेनच्या कोरडय़ा आक्रोशात तो आपल्या देशात परत आला
आहे. अशा तरुण शास्त्रज्ञांची सर्व अर्थाने आशा आकांक्षा आणि अपेक्षा यांची परिपूर्ती करू शकणारी व्यवस्था निर्माण होणे, ही आज काळाची गरज आहे.
सुरेंद्र दिघे- surendradighe@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Student of astronomy