scorecardresearch

महाविद्यालयांत पहिल्या दिवशी विद्यार्थी संख्या कमीच ; लसीकरण पूर्ण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनुपस्थित

ज्ञानसाधना महाविद्यालयात पहिल्या दिवशी २५ ते ३० टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

महाविद्यालयांत पहिल्या दिवशी विद्यार्थी संख्या कमीच ; लसीकरण पूर्ण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनुपस्थित
ज्ञानसाधना महाविद्यालयात अध्यापनास बुधवारी सुरुवात झाली.

चॉकलेट, गुलाबपुष्प देऊन महाविद्यालयांकडून स्वागत

ठाणे : जिल्ह्यातील महाविद्यालये बुधवारपासून सुरू झाली असली तरी पहिल्याच दिवशी बहुतेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमीच होती. करोना लशीच्या दोन मात्रा पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत असल्यामुळे अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहिले. दीड वर्षांनंतर महाविद्यालयात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. काही महाविद्यालयांनी चॉकलेट तर काहींनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

करोना प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये अॉनलाइन पद्धतीने सुरू होती. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. ४ अॉक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या असून बुधवारपासून महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. ठाणे शहरातीलही बहुतांश महाविद्यालये करोना नियमांचे पालन करून सुरू झाली आहेत. करोना लशीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत असल्यामुळे बहुतांश महाविद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थी संख्या कमी असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, विद्यार्थी दीड वर्षांनंतर महाविद्यालयात येत असल्यामुळे महाविद्यालयांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात केवळ तेरावी आणि पंधरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेले आणि ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे ते विद्यार्थीच पहिल्या दिवशी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना महाविद्यार्थ्यांच्या प्रवेशद्वारावर चॉकलेटचे वाटप करून स्वागत करण्यात आले, अशी माहिती जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी दिली. तसेच महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांचे लसीकरण महापालिकेच्या साहाय्याने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्ञानसाधना महाविद्यालयात पहिल्या दिवशी २५ ते ३० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. या महाविद्यालयात पहिल्याच दिवशी ठाणे महापालिकेमार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जास्ती जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चित्ते यांनी दिली. तसेच रघुनाथ नगर भागातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातही विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अॉनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालय व्यवस्थापकांकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी रेल्वे बंद असल्यामुळे शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयात येता आले नसल्याची माहिती काही महाविद्यालय व्यवस्थापकांनी दिली.

विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील केबीपी महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी तेरावीच्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत केले. तेरावीचे विद्यार्थी पहिल्यांदाच महाविद्यालयात आले असल्याने त्यांना संघटनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयी संपूर्ण माहिती दिली. पहिल्या दिवशी या महाविद्यालयात ३५ ते ४० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. तसेच गूगल फॉर्मद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या केलेल्या सव्‍‌र्हेनुसार ६० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. येत्या आठवडय़ाभरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणसाठी शिबीर आयोजित करणार असल्याची माहिती केबीपी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-10-2021 at 01:32 IST

संबंधित बातम्या