scorecardresearch

ठाणे जिल्ह्यतील बहुतांश शाळा सुरू

राज्य सरकारने बालवर्गापासूनचे सर्व वर्ग सोमवारपासून प्रत्यक्ष भरवण्यास परवानगी दिली असली तरी, सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शाळांत किलबिलाट कमी पाहायला मिळाला.

ठाण्यातील काही शाळांमध्ये पूर्व प्राथमिकचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यात आले. (छायाचित्र : सचिन देशमाने)

करोनाच्या भीतीने ऑनलाइन वर्गांनाच विद्यार्थी-पालकांचे प्राधान्य

ठाणे: राज्य सरकारने बालवर्गापासूनचे सर्व वर्ग सोमवारपासून प्रत्यक्ष भरवण्यास परवानगी दिली असली तरी, सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शाळांत किलबिलाट कमी पाहायला मिळाला. जिल्ह्यातील बहुतांश शाळा सोमवारी खुल्या झाल्या; परंतु करोना रुग्णांची संख्या अद्याप जास्त असल्यामुळे संसर्गाच्या भीतीने अनेक पालक-विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वर्गातच हजेरी लावली. पूर्वप्राथमिकचे वर्ग मात्र, अद्याप शाळांनीही सुरू केलेले नाहीत. 

ठाणे ग्रामीण भागासह शहरी भागातही १५ डिसेंबरपासून माध्यमिक वर्गापाठोपाठ प्राथमिकचे वर्गही भरण्यास सुरुवात झाली होती. हळूहळू प्रत्यक्ष शाळेतील उपस्थितीही वाढू लागली. मात्र, डिसेंबरच्या अखेरीस ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येतील वाढीवर काहीसे नियंत्रण आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्वप्राथमिकपासून सर्वच वर्ग प्रत्यक्ष भरवण्यास परवानगी दिली. याबाबतचे अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनानेही राज्य शासनाच्या आदेशांनुसार सोमवारपासून शाळा खुल्या करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरू करण्यात आल्या. 

ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती शाळेत पहिली ते दहावीचे वर्ग आधीच्या नियमावलीनुसार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, पूर्वप्राथमिकचे वर्ग अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे शाळा व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.  वर्ग सुरू करताना पालकांचे संमतिपत्र प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बैठका आयोजित करण्यात येत असून त्यांच्याकडून संमतिपत्र घेण्यात येत आहेत. पालकांचे संमतिपत्र प्राप्त होताच पुढील आठवडय़ापासून पूर्वप्राथमिकचे वर्ग सुरू करण्यात येतील, असे सरस्वती शाळेचे संस्थापक सुरेन्द्र दिघे यांनी सांगितले, तर बेडेकर शाळेतही पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतिपत्र घेण्याचे काम सुरू आहे. पालकांचे संमतिपत्र मिळाल्यानंतर १ फेब्रुवारीपासून पहिल्या टप्प्यात मोठा शिशूचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर, पुढील आठवडय़ात लहान शिशूचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती बेडेकर शाळेच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्यध्यापिका सीमा केळकर यांनी सांगितले. राम मारुती भागातील शिव समर्थ शाळेतही पूर्वप्राथमिकचे वर्ग फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरातही काहीसे असेच चित्र पाहायला मिळत आहे. 

पटसंख्या कमीच

ठाणे जिल्ह्यातील काही शाळांमधील प्राथमिक वर्ग सुरू झाले, मात्र विद्यार्थी संख्या फारच कमी असल्याचे दिसून आले. बरेचसे पालक अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन वर्गावर या पालकांचा भर दिसून येत आहे, अशी माहिती ठाण्यातील एका शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापकाने दिली. सोमवारी काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अगदी नगण्य अशी होती, असेही शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students corona schools start ysh