विद्यार्थी आजपासून नवीन इमारतीत स्थलांतरित

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले मार्गावरील अरुणोदय शाखेचे स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी आजपासून सुसज्ज नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येत आहेत. प्राथमिक ते दहावी इयत्तेपर्यंतचे वीस तुकडय़ांमधील १३०० विद्यार्थी नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी नवीन वास्तूत प्रवेश करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त मोकळी जागा असावी, या उद्देशाने या वास्तूची उभारणी करण्यात आली आहे. एकीकडे मराठी शाळांची घसरण सुरूअसताना, मराठी अभ्यासक्रमासह इंग्रजी शिक्षण देणारी स्वामी विवेकानंद शाळेची अरुणोदय शाखा सर्व शैक्षणिक सुविधांनी युक्त ‘उत्कृष्ट अद्ययावत शाळा’ करण्याचा मानस संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

संस्थेची महात्मा फुले रस्त्यावरील शाळेची जुनी इमारत लोड बेअरिंगची आहे. शाळेची इमारत धोकादायक नसली तरी, वाढती विद्यार्थी संख्या, नवनवीन शैक्षणिक उपक्रम, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शाळेचे कार्यालय, शिक्षकांची प्रतीक्षा खोली यासाठी स्वामी विवेकानंदच्या अरुणोदय शाखेला सुसज्ज इमारतीची गरज होती. या वाढत्या जागेचा विचार करून संस्थेने शाळेजवळील जागा मिळवली. नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली होती. आता इमारत बांधून पूर्ण झाली आहे. दोन माळ्याच्या नवीन वास्तूत चौदा वर्ग खोल्या आहेत. शाळेला एकूण २१ खोल्यांची गरज आहे. सकाळी दहा तुकडय़ा आणि दुपारी दहा तुकडय़ा अशा दोन सत्रांमध्ये विद्यार्थी या नवीन वास्तूत बसविण्यात येणार आहेत.

शाळेचे प्रयत्न

शाळेला वाढीव १.५ चटई क्षेत्र बांधकामासाठी उपलब्ध झाले तर उर्वरित बांधकाम करणे संस्थेला शक्य होणार आहे. वाढीव चटई क्षेत्र मिळावे म्हणून शासन, पालिकास्तरावर प्रयत्न करण्यात आले, पण त्यास यश आले नाही. शिक्षण संस्था म्हणून शासनाने वाढीव चटई क्षेत्र देण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

सोसायटीचे मैदान शाळेसाठी मिळविण्याचे प्रयत्न सुरूआहेत.

विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी समुपदेशन, नृत्य, कला, संगीताचे प्रशिक्षण शाळेत देण्यात येते.

अद्ययावत सुविधा

वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नियंत्रण   मुख्याध्यापक कक्षात असेल.एलसीडीच्या माध्यमातून ई-लर्निगची सुविधा

सुसज्ज खेळणीघर, प्रयोगशाळा, संगणक कक्षाची रचना

शाळेत आल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करतो. पण तो पुढे देशाचा आदर्श नागरिक बनला पाहिजे. हा विचार करून राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या सर्व शाखांमध्ये क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा, संगीत, नृत्य, संस्कार, विद्यार्थ्यांना विविध शाळाबाह्य़ स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी केले जाते. अन्यत्र मराठी शाळा एकीकडे बंद होत असताना, मराठी शाळा टिकल्याही पाहिजेत म्हणून संस्था सतत प्रयत्नशील आहे.

संजय कुलकर्णी, कार्यवाह, राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली.