scorecardresearch

कल्याणमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी अभ्यासिका

अभ्यास केंद्रात नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरमहा २०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक तरूण, तरूणी राज्य, केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निवांतपणा मिळावा, अभ्यासाच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची पुस्तक उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात अभ्यासिका सुरू केली आहे.

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौका जवळील सहजानंद चौकात झोझवाला संकुलातील दिवंगत खासदार प्रकाश परांजपे स्पर्धा परीक्षा केंद्रात ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अभ्यासिका रविवार ते शनिवार आठवड्यातील सात दिवस सकाळी सात ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या केंद्रातील प्रवेशासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत इच्छुकांनी केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. अभ्यास केंद्रात नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरमहा २०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

अभ्यासिकेत प्रवेश घेतल्यानंतर सलग १५ दिवस विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल. अभ्यासिकेत इंटरनेट, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुस्तके घरी नेण्याची विद्यार्थ्यांना परवानगी नसेल, असे केंद्र प्रमुखाने सांगितले.

कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक चाळ, झोपडी, सामान्य कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक विद्यार्थी सुस्थितीत कुटुंबातील असतात, पण घरात निवांतपणा मिळत नसल्याने त्यांची अभ्यासाची अडचण होते. अनेकांना घराच्या लहान आकारामुळे घरात अभ्यास करणे शक्य होत नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेले झोझवाला संकुलातील दिवंगत प्रकाश परांजपे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचे आदेश मालमत्ता विभाग उपायुक्त पल्लवी भागवत यांना दिले होते. या केंद्राची देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर हे केंद्र आता सुरू करण्यात आले.

काही वर्षापूर्वी या केंद्रात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते. हळूहळू विद्यार्थी, मार्गदर्शक येणे बंद झाल्याने हे केंद्र बंद पडले होते. त्याला पुन्हा उर्जितावस्था देण्याचे काम आयुक्त सूर्यवंशी, उपायुक्त भागवत यांनी केल्याने विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Study centre in kalyan for youth people preparing for competitive examination asj