शहापूर तालुक्यात उपवनसंरक्षक विभागाचा पावसाचे पाणी अडविण्याचा उपक्रम

कल्याण : डोंगर उतारावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी डोंगराच्या पायथ्याशी जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी शहापूर वन विभागाने समतल चर उपक्रम हाती घेतला आहे. डोंगरांच्या पायथ्याशी पाच फूट लांब आणि दीड फूट रुंदीचे चर खोदले जातात. या चरीतून खोदून काढलेली माती उतार बाजूला जमा केली जाते. भूजल पातळी वाढवून वृक्ष संवर्धन करण्याच्या या उपक्रमात तालुक्यातील वन विभागाच्या ताब्यातील डोंगर, माळरानावर दोन ते तीन लाखांहून अधिक चर खोदले आहेत, अशी माहिती वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे वन विभागाला पूर्ण करायची आहेत. शहापूर उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या ग्रामीण, आदिवासी भागांतील डोंगर, पठारांवर चरांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी शहापूर वन विभागाला शासनाकडून एक कोटी २५ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरावर पडणारे पाणी उतारावरून वाहून जाते. हे पाणी डोंगराच्या पायथ्याशी समतल चौकोनी चर खोदून अडविले तर चार महिन्यांच्या काळात चर पावसाच्या पाण्याने भरलेले राहतात. दरवर्षी हे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरण्यास सुरुवात झाली की पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढेल. डोंगर उतारावर नैसर्गिक पाण्याचा स्रोत उपलब्ध झाल्याने झाडांचे आयुर्मान वाढणार आहे. जंगली प्राणी, पक्षी यांची पिण्याच्या पाण्याची सोय प्रत्येक भागात होणार आहे. डिसेंबरनंतर पावसामुळे तयार झालेले जलसाठे आटू लागले की जंगली प्राण्यांना पाण्यासाठी आपला निवास बदलावा लागतो. तशी वेळ या चर पद्धतीमुळे येणार नाही, असे अधिकारी म्हणाला. धसई, डोळखांब वन परिक्षेत्राच्या हद्दीत वन विभागाच्या जमिनींवर डोंगर, टेकडय़ा, माळरानांवर समतल चर खोदण्याची कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. आतापर्यंत दोन ते तीन लाखांहून अधिक चर डोंगर भागात खोदण्यात आले आहेत. झाडांना मातीचे भराव देऊन त्यांचे आयुर्मान वाढविले आहे. धसई वन परिक्षेत्रातील खैरे, सारंगपुरी, पाचिवरे, कोठारे, शेणवे, डोळखांब वन परिक्षेत्रात बाबरे, साकडबाव, जांभूळवाड, चिल्हारवाडी, जुनवणी हद्दीत ही कामे सुरू आहेत. अधिकाधिक चर खोदण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.