ठाणे : एकेकाळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक मानला जाणारा सुभाषसिंह ठाकूर याला आज, मंगळवारी ठाणे न्यायालयात हत्येच्या प्रकरणात हजर करण्यात आले. वसई-विरार-मिरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने उत्तरप्रदेशातील फतेहगड मध्यवर्धी कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याची कोठडी पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या कोठडीमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील जे.जे. हत्याकांड प्रकरणी सुभाषसिंह याला अटक झाल्यानंतर तो उत्तरप्रदेशातील कारागृहात शिक्षा भोगत होता.
विरार येथील विकासक समय चौहान याची २६ फेब्रुवारी २०२२ मध्ये मनवेलपाडा येथे हत्या झाली होती. या प्रकरणी १३ जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी हा सुभाषसिंह ठाकूर होता. तसेच तो मुंबईतील बहुचर्चित जे.जे. हत्याकांडमध्ये देखील आरोपी होता. या प्रकरणात तो उत्तरप्रदेशातील फतेहगड कारागृहात शिक्षा भोगत होता. त्यानंतर उपचाराचे कारण पुढे करत त्याला एका रुग्णालयात ठेवण्यात आले होते. अखेर समय चौहान प्रकरणात सुभाषसिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारी वकील काय म्हणाले..
सरकारी वकील संजय मोरे यांनी सांगितले की, समय चौहान याच्या प्रकरणात सुभाषसिंह ठाकूर याला अटक झाली आहे. या हत्येप्रकरणात सुभाषसिंह याची महत्त्वाची भूमिका आहे. समय याला मारण्याची सुपारी दिली होती असा आरोप सुभाषसिंह याच्यावर आहे. या प्रकरणात आरोपीने मोबाईल वापरले ते कुठे नष्ट केले. तसेच आरोपी अखिलेश तिवारी याने शस्त्र सुभाषसिंह याच्या सांगण्यावरून नष्ट केले होते अशी माहिती आहे, त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. ही पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली असून त्याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याचे वकील मोरे म्हणाले.
याप्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण झाली असून आरोपीला किती पैसे मिळाले, किती रुपयांची सुपारी दिली याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात आणखी कोणी आरोपी आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे असेही मोरे यांनी सांगितले.
