ठाणे : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांना कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावता यावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत आर्थिक साहाय्य दिले जाते. विशेषत: घरघंटी व शिलाई यंत्रणा खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे अनेक महिलांना स्वत:चा रोजगार सुरू करण्याची संधी मिळाली. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २०० हून अधिक महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने दिली.

महिलांनी रोजगारासाठी पुढे येणे, ही केवळ त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची बाब नसून, संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक महिलांनी स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन वेळोवेळी केले जाते. यासाठी शासनस्तरावर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर केली जाते. त्यातील एक म्हणजे घरघंटी आणि शिलाई मशीन खरेदीसाठी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान ही एक योजना आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी तालुकास्तरावर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यानंतर जी महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असते अशा महिलांचा अंगणवाडीसेविका अर्ज भरून घेतात. त्यानंतर, तो अर्ज महिला व बालविकास विभागाकडे येतो. त्या अर्जांची छाननी होऊन लाभार्थी महिलेला घरघंटी किंवा शिलाई यंत्रणा घेण्यासाठी अनुदान दिले जाते. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २०० हून अधिक महिलांना अर्थसाहाय्य मिळाले. यामध्ये ११५ महिलांनी घरघंटी, तर ८६ महिलांनी शिलाई मशीन घेतली असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली.

योजनेचे निकष

या योजनेचा लाभ विधवा, परित्यक्ता आणि दारिद्र्यरेषेखाली म्हणजे ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना प्राधान्याने दिला जातो.

या योजनेसाठी चालू वर्षाकरिता ६०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या महिलांच्या अर्जांची छाननी करून लवकरच लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

महिलांच्या सक्षक्तीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. त्यातील घरघंटी आणि शिलाई यंत्रणासाठी अर्थसाहाय्य ही एक योजना आहे. या योजनेविषयी ग्रामीण भागातील महिलांना माहिती मिळावी, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पत्रके लावली आहेत. तसेच अंगणवाडीसेविकांच्या मार्फत योजनेची जनजागृती केली जात आहे.संजय बागुल, विभागप्रमुख, महिला व बालविकास, ठाणे जिल्हा परिषद

घरघंटी, शिलाई यंत्रणा खरेदीसाठी महिलांना मिळालेले अनुदान (तालुकानिहाय)

तालुकाघरघंटी शिलाई यंत्रणा
अंबरनाथ ०९ ०५
शहापूर ३५ १५
भिवंडी४२४०
कल्याण १४ ०६
मुरबाड १५ २०
एकूण ११५ ८६