ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरू नये, यावर लवकर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. करोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगाचे रुग्ण आढळत आहेत. परंतु रुग्णांनी घाबरून न जाता वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिस हा आजार बरा होऊ शकतो. हे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने दाखवून दिले आहे.

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयामधील पाच म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे.