ठाणे- कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरातील १३ नागरिकांचा चावा घेणाऱ्या भटक्या श्वानाचा अचानकपणे मृत्यु झाला आहे. या श्वानाचा रेबीज आजारामुळे मृत्यु झाल्याच्या चर्चेमुळे त्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या श्वानाच्या मृत्युचे कारण अद्याप समजु शकलेले नसून श्वविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल, असे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे शहरात भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशाचप्रकारची घटना सोमवारी ठाण्यातील पूर्वेतील अष्टविनायक चौक परिसरात घडली. या भागातील एका भटक्या श्वानाने १३ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. त्यात तीन ते चार महिलांसह वृद्धांचा समावेश आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्या श्वानाचा अचानकपणे मृत्यु झाला. या श्वानाचा रेबीज आजारामुळे मृत्यु झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या चर्चेमुळे त्याच्या हल्ल्यात जखमी झालेले नागरिक भेदरले आहेत. या संदर्भात ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, श्वानाचा मृत्यु कसा झाला हे समजू शकलेले नाही. एका प्राणीप्रेमी संघटनेने श्वानाचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या अहवालानंतरच त्याच्या मृत्युचे कारण समजू शकले. तसेच ज्या नागरिकांना श्वानाने चावा घेतला आहे, त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावे, असे त्यांनी सांगितले.