डोंंबिवली – करोना महासाथीनंतर डोंबिवलीतील एक १९ वर्षाचा तरूण बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होता. आपणास मरायचे आहे, असे सतत तो म्हणत असे. त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार सुरू होते. शनिवारी रात्री या तरूणाने डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

गेल्याच आठवड्यात डोंबिवलीतील एका तरूणाने नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली होती. दोन दिवसापूर्वी निळजे लोढा हेवनमधील एका तरूणीने समाज माध्यमांवर सतत दिसते म्हणून वडील ओरडल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. तरूणांच्या या वाढत्या आत्महत्यांमुळे नागरिकांंमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.प्रज्वल सुधीर महाजन (१९, रा. हरी ओम पूजा सोसायटी, गरीबाचापाडा, डोंबिवली) असे मृत तरूणाचे नाव आहे. या मुलाची आई मनीषा महाजन यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अकस्मित मृत्यूंची नोंंद केली आहे.

हेही वाचा >>>बदलापूरच्या उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, किरकोळ पावसातच खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत

पोलिसांनी सांगितले, मयत प्रज्वल महाजन या तरूणाला करोना महासाथीनंतर बायपोलर डिसऑर्डर हा मानसिक आजार जडला होता. त्याच्यावर कल्याण येथील मनोदय रुग्णालयाचे डाॅ. धर्माधिकारी, जे. जे. रुग्णालयातील मनोविकार विभागातील डाॅक्टरांकडून उपचार सुरू होते. सततच्या अस्वस्थतेमुळे प्रज्वल मला आता श्रीमंत व्हायचे आहे. मला मरायचे आहे. माझे आता वय झाले आहे. जगण्यात आता काही अर्थ नाही त्यामुळे मला आत्महत्या करायची आहे, अशी विधाने करत होता. त्यामुळे कुटुंबीय प्रज्वलची अधिक काळजी घेत होते. त्याला कधीही एकटा घरात, बाहेर सोडत नव्हते.

त्याच्यावरील वैद्यकीय उपचार सुरू ठेऊन तो ग्रस्त आजारातून बाहेर येईल, अशी आशा कुटुंंबीय ठेऊन होते. परंतु, शनिवारी रात्री आठ वाजता प्रज्वल नेहमीप्रमाणे मोठ्या ओरडत आता मला मरायचे आहे. माझे वय झाले आहे, असे मोठ्या ओरडत तो शय्या गृहात गेला. त्याने आतून दरवाजाची कडी लावली. शय्या गृहातील ओढणी छताच्या पंंख्याला अडकवून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कृटुंबीयांनी दरवाजा उघडण्यासाठी प्रज्वलला खूप गळ घातली. खोलीच्या आतून त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर दरवाजाची आतील कडी तोडण्यात आली. त्यावेळी प्रज्वलने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.