डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील स्थानिक पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे यांनी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षभरात जिल्हाध्यक्ष असताना पक्षातर्फे अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परिसंवाद यात्रेत महत्वपूर्ण भूमिका बजावली. ही पोटदुखी काही मंडळींना सहन न झाल्याने त्यांनी एक वर्षात आपणास पदावरुन पायउतार होण्यासाठी कुरघोडीचे राजकारण सुरू केले. हे सहन होत नसल्याने आपण राजीनामा दिला आहे, असे जिल्हाध्यक्ष रोकडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून पक्षहिताचे अनेक उपक्रम आपण राबविण्यास सुरुवात केली होती. परिसंवाद यात्रेतील आपला सहभाग अनेकांना रुचला नाही. तेव्हापासून आपल्या विरुध्द पक्षातील काही उपद्रवमूल्य मंडळींनी कारस्थाने सुरू केली. कोकण विभागीय अध्यक्षांवर दबाव आणणे, मारण्याच्या धमक्या देणे, आपली ठेकेदारीची कामे रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पक्ष कार्य करत असताना या कारस्थानांना आपणास तोंड द्यावे लागत होते. आपल्या उपजीविकेच्या साधनावर गदा आणण्याचे प्रयत्न झाले. राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपणास एक वर्षात पदावरुन दूर केले जात आहे. कोकण विभाग अध्यक्षांनी जिल्हाध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आपले कोणतेही म्हणणे ऐकून न घेता पक्षाने एकतर्फी हा निर्णय घेतला आहे. पक्षातील नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत किंवा स्वता निवडून येऊ न शकणारे पक्षाचे प्रदेश, राष्ट्रीय नेते म्हणून मिरवणार असतील तर पक्षाने कोणत्या निकषाच्या आधारावर त्यांच्या या जबाबदाऱ्या टाकल्या असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे, असा प्रश्न रोकडे यांनी पत्रात केला आहे.

आपणास पक्षात वरचे पद देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी कुरघोडी, कारस्थान करणारी मंडळी पक्षात कार्यरत राहणारच आहेत. त्यामुळे पक्षात काम करणे अवघड होणार असल्याने आपण पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे रोकडे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

शिंदे गटात सामील होणार

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. सहकाऱ्यांची बैठक घेऊन एकत्रित निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा विचार सुरू आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

डोंबिवलीत झटका

राष्ट्रवादी काँग्रेसची डोंबिवली क्षेत्रातील सर्व पदे आपल्याच घरात नातेवाईकांनी मिळाली पाहिजेत असेच राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील काही पदाधिकाऱ्यांचे गणित आहे. कुरघोडीचा केंद्रबिंदू २७ गावांमध्ये आहे. हे गणित पक्षाला मारक असताना त्यांच्या मागणीला वरिष्ठ मान देत असल्याने इतर निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ पदाधिकारी लवकरच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. आपण स्वता येत्या दोन ते तीन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस डोंबिवली शहर कार्याध्यक्ष आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहोत. आपणास कार्याध्यक्ष पदासाठी यापूर्वी तीन वेळा डावलण्यात आले होते, अशी माहिती कार्याध्यक्ष भाऊ पाटील यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sujit rokde resignation from kalyan dombivli nationalist student congress district president amy
First published on: 06-08-2022 at 14:34 IST