scorecardresearch

शाळांमध्ये उन्हाळी शिबिरांची लगबग सुरू;भाषा संवर्धनासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिबीर

करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे उन्हाळी शिबिरांमध्ये खंड पडला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून शाळा, महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत.

ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे उन्हाळी शिबिरांमध्ये खंड पडला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून शाळा, महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी शिबिराचा आनंद लुटता येणार आहे.
ठाणे शहरातील काही शाळा प्रशासकांकडून उन्हाळी शिबिराची तयारी सुरू झाली असून यामध्ये भाषा संवर्धन, गणित आणि विज्ञानविषयक गोडी निर्माण करणारे उपक्रम त्यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम या उन्हाळी शिबिरात असणार आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली.
शाळेला सुट्टी लागताच मुलांना आणि पालकांना उन्हाळी शिबिरांचे वेध लागतात. नृत्य, संगीत, कराटे, पोहणे, साहसी खेळ कथालेखन अशा विविध प्रकारची उन्हाळी शिबिरे शाळा तसेच संस्थांमार्फत राबविण्यात येतात. ठाण्यात शैक्षणिक संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या अशा शिबिरांना पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. करोना प्रादुर्भावामुळे या उन्हाळी शिबिरांमध्ये खंड पडला होता. गेल्या वर्षी काही आयोजकांनी ऑनलाइन माध्यमातून काही शिबिरे भरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
यंदा करोनाचा संसर्ग अटोक्यात आल्यामुळे शहरातील काही शाळा प्रशासकांनी उन्हाळी शिबिरांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे या उन्हाळी सुट्टीत हिमालयन साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिद्द, ज्ञान आणि साहस या त्रिसूत्रीवर आधारित हे शिबीर असणार आहे, अशी माहिती जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक सुरेंद्र दिघे यांनी दिली. ५ ते २० मे या कालावधीत मनाली येथे हे शिबीर पार पडणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर, इतर विद्यार्थ्यांसाठी भाषा संवर्धन हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये मराठी आणि संस्कृत भाषेचा समावेश असणार आहे, असे दिघे यांनी सांगितले.
विद्या प्रसारक मंडळामार्फत स्पोटर्स क्लब सुरू करण्यात आले आहे. या क्लबमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. यंदा मोठय़ा संख्येने मुले विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी क्लबमध्ये येत आहेत, अशी माहिती बेडेकर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना अडसुळ यांनी दिली. भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांशी संबंधित उपक्रम उन्हाळी शिबिरात आयोजित करण्याचे नियोजन आहे, असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
ठाण्यातील लोकमान्यनगर भागातील रा.ज ठाकूर शाळेत २३ एप्रिल ते १ मे या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पुस्तक वाचन, कथाकथन, निबंध लेखन असे विविध उपक्रमही घेतले जाणार आहेत. त्यासह, दासबोधाविषयीही विद्यार्थ्यांना शिबिरात माहिती दिली जाणार आहे. हे शिबीर पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, अशी माहिती मुख्याध्यापक डी. आर. पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Summer camps started schools camps students art skills amy

ताज्या बातम्या