ठाणे स्थानकात फलाटांवरील पत्रे काढल्याने हालांत भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे स्थानकातील फलाटांवरील महिला डबा थांबत असलेल्या ठिकाणी रेल्वे फलाटांवरील पत्रे काढण्यात आल्याने महिला प्रवाशांना उन्हात ताटकळत राहावे लागत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जेथे छत आहे तेथे उभे राहिल्यास लोकल पकडण्यासाठी धावधाव करावी लागते. स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन, तीन, चार, पाच आणि सहा अशा सगळ्याच फलाटांवर ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महिला प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उन्हाची काहिली वाढू लागल्याने याच काळात ठाणे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावरील छप्पर काढून टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उन्हात अधिक काळ उभे राहू नये यासाठी शासकीय स्तरावरून सगळ्यांना सूचित केले जात आहे. अशा परिस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात महिला डबा थांबत असलेल्या ठिकाणी फलाटांवरील पत्रे काढून टाकण्यात आल्याचे दिसून येते. वर्षभरापासून अधिक काळ ही परिस्थिती असून गेल्यावर्षी पावसाळाही महिला प्रवाशांनी पावसाच्या धारा अंगावर झेलत काढला होता. उन्हाळ्यातही हीच परिस्थिती कायम असल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे.

ठाणे स्थानकात कळवा बाजूकडे एका पादचारी पुलाचे काम सुरू आहे. हे कामे पूर्ण करण्यासाठी फलाटांवरील छताचे पत्रे काढून टाकण्यात आले आहेत. या कामासाठी फलाटांवर लोखंडी काम उभे करण्यात आले असले, तरी गर्डर चढवण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. महिलांना डब्यातून उतरल्यावर तात्काळ पुलावर चढता यावे यासाठी हा पूल उभारण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम रखडल्यामुळे उन्हात उभे राहून गाडीत चढण्याची आणि उतरण्याची कसरत महिलांना करावी लागत आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावरील कळव्याकडील प्लाटफॉर्मचा काही भाग गेले वर्षभर छताविना आहे. या ठिकाणी नेमका महिला डब्याचा थांबा असल्याने अनेकदा महिलांना याचा त्रास भोगावा लागतो. पावसाळ्यात इतरत्र सर्व प्रवासी छताखाली उभे राहतात, तर या ठिकाणच्या प्रवाशांना भर पावसात छत्री धरून उभे राहावे लागले. अशावेळी गाडी पकडण्यास गैरसोय होत असे. मात्र ही परिस्थिती आजही सुधारलेली नाही. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत जात असताना, छत नसल्याने महिला प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.

– प्रांजली उत्तेकर, महिला प्रवासी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunstroke hit female commuter at thane platform due to shed removed
First published on: 05-04-2017 at 03:35 IST