Supriya Sule Thane Press Conference: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढून टाकले म्हणून दोन तासांत अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. पण, दुसरीकडे माझे भाऊ अजित पवार यांच्या मृत्युप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. अजित पवार गेल्यानंतरही त्यांच्या पक्षाचे आमदार व खासदार सत्ता भोगत आहेत पण, त्यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत त्यापैकी एकही आमदार बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या बुधवारी ठाण्यातील पक्ष कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकार व अजित पवार गटावर केली. अजित पवार गट हा राज्यातील सत्तेत सहभागी आहे. याच सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. पण, त्यांच्या पक्षातील आमदार-खासदारांनी माझ्या भावाच्या एफआयआर बद्दल एक शब्द काढलेला नाही. माझा भाऊ गेला पण, त्यानंतरही त्यांच्या पक्षाचे लोक सत्ता भोगत आहेत. याप्रकरणाचा तपास नेमका कुठे सुरू आहे, त्याची स्थिती काय आहे, हेच आम्हाला माहिती नाही.

महाराष्ट्रात प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे, हे कळत नाही. तसेच हे आता नवे राहिलेले नाही. याची सवयच झाली आहे. कोल्हापुरातही शेतकरी शक्तीपीठ प्रकल्प नको, असे सांगत आहेत, तरीही तो प्रकल्प लादला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

मतदार याद्यांची सखोल फेरतपासणीतून कोणाची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही रोज तपासणी करत आहोत. नेमकी किती आणि कोणाची नावे कमी झाली आहेत, याचा आम्ही आढावा घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे वर्तुळाकार मेट्रो, डेटा सेंटरला विरोध

ठाणेकरांना ठाणे वर्तुळाकार मेट्रो नको आहे. चांगली बससेवा द्यावी अशी त्यांची मागणी आहे. हीच आमच्या पक्षाचीही मागणी आहे. त्यामुळे ५०० रुपयांत होणारे काम एक लाख रुपयांना का करायचे, अशी विचारणा करत सरकारला महागडा प्रकल्प आवडतो. पण सामान्य माणसासाठी असलेल्या छोट्या प्रकल्पांसाठी निधी नाही, अशी टिका त्यांनी केली.

महागाईच्या झळा

महागाईची झळ प्रत्येकाला बसत आहे. दूध १०० रुपयांच्या पुढे गेले आहे. सामान्य माणसाने जगायचे कसे, सर्वसामान्य नागरिक कर भरतो, पण त्याला स्वस्त काय मिळत आहे, हे सरकारने सांगावे, असेही त्या म्हणाल्या.

न्यायालयीन सुनावणीबाबत

मी सांगत आहे की, आमची बाजू ऐकून घ्या. मात्र आमच्या प्रकरणात तारीखच पडत नाही. ‘तारीख पे तारीख’ हा दिवस आमच्या आयुष्यात कधी संपेल, असा सवाल त्यांनी केला.