Surat Mangaluru Express Regularized: ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सूरत ते मंगळूरू या रेल्वेची नियमित सेवा सुरु झाल्याने ही रेल्वे सूरत-मंगळूरु-सूरत अशी द्विसाप्ताहिक ट्रेन म्हणून धावणार असून कोकण पट्ट्यातील अनेक स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे.
ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात लाखो कोकणावासीय नोकरी निमित्ताने वास्तव्यास आहेत. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने येथील नागरिकांना गर्दीतूनच प्रवास करावा लागतो. गणेशोत्सव, होळीमध्ये प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. सूरत -मंगळूरू या ट्रेनला आता द्विसाप्ताहिक ट्रेन म्हणून दर्जा देण्यात आला आहे. एप्रिल २०२३ मध्ये सूरत जवळील उधना जंक्शन आणि मंगळुरू जंक्शन दरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष म्हणून ही ट्रेन सुरू झाली होती, तिच्या लोकप्रियतेमुळे नंतर द्विसाप्ताहिक करण्यात आली आणि सुरतपर्यंत वाढवण्यात आली.
मंत्रालयाने नियमित अंतराने या सेवेचा विस्तार करणे सुरू ठेवले आहे. या सेवेच्या नियमितीकरणामुळे विशेष ट्रेनचे भाडे नियमित एक्सप्रेस ट्रेनच्या भाड्याइतके कमी होण्याची शक्यता आहे. सूरतहून सुटणाऱ्या गाडी क्रमांक १९०५७ ची नियमित सेवा ३ जूनपासून सुरू होईल, तर मंगळूरू जंक्शनहून सुटणाऱ्या गाडी क्रमांक १९०५८ ची नियमित सेवा ४ जूनपासून सुरू होईल.
या स्थानकांमध्ये थांबेल ट्रेन
उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड,भिवंडी रोड,पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळून, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुम्ठा, मुरडेश्वर, भटरुळ, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुन्दपुरा, उडुपी, मुल्की, सुरयखल, कुन्दपुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर ही गा़डी थांबणार आहे. ट्रेनमध्ये एक टू-टियर एसी, सात थ्री-टियर एसी, सहा स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन लगेज-कम-ब्रेक व्हॅन डबे असतील.
