डोंबिवली – डोंबिवलीतील साहित्य, संस्कृती आणि वाचन संस्कृतीमधील एक महत्वाचा घटक म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी गुरूवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे जिल्हा संस्थेच्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी आणि ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाडमयीन त्रैमासिकाच्या संपादक पदाचा तडकाफडकी राजीनामा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षांकडे दिला.

मागील काही दिवसांपासून ‘मसाप’ची डोंबिवली शाखेची निवडणूक विविध प्रकारचे परिवारातील, राजकीय हस्तक्षेप, दबाव यांच्यामुळे गाजत होती. समाज माध्यमांत याविषयी जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर त्याचे प्रत्यंतर देशपांडे यांच्या राजीनाम्याने उघड झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेत फार वावर नसलेल्या मंडळींनी ‘वरून’ आदेश आल्याने साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठ्या हालचाली केल्या.

पुणे, बोरिवलीतील काही मंडळींनी हस्तक्षेप करून जुन्या मंडळींना आता बाजुला सारून ‘आपली’ माणसे बसवा असे फर्मान सोडल्याने आणि डोंबिवलीतील स्थानिकांनीही त्याला साथ दिली. १९८५ पासून विनावाद महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचा कारभार केल्याने आता घडल्या प्रकाराने आपण खूप व्यथित झालो आहोत. असा प्रकार आपण कधी पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया सुरेश देशपांडे यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे संस्थेचे अध्यक्ष योगेश सोमण यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात सुरेश देशपांडे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष या नात्याने आपण केलेला अनावश्यक हस्तक्षेप आणि ढवळाढवळ याच्या निषेधार्थ आपण हा राजीनामा देत आहोत.

घटनेप्रमाणे ‘मसाप’च्या शाखा स्वतंत्रपणे स्थानिक निवडणुका घेऊ शकतात. याची पूर्ण कल्पना असतानाही आपण माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एवढे नव्हे तर ज्या व्यक्तिचा ‘मसाप’शी काही संबंध नसताना त्या व्यक्तिमार्फत ‘योगेश समर्थनार्थ पॅनल’ उभे केलेत. शिवाय आपल्या सहकाऱ्यांसह जो काही प्रचार केला. डोंबिवली शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण गढुळ, दूषित आणि कलुषित झाले आहे, असे देशपांडे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

यापूर्वीच्या डोंबिवली मसापच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या होत्या. यावेळी मनभेद आणि मतभेद निर्माण केले गेले. आपण ज्या व्यक्तींना उमदेवारी दिली, त्यातील काही व्यक्ती या यापूर्वीच्या कार्यकारिणीत होत्या. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांना स्वताहून बाहेर पडावे लागले होते. त्यातील काही व्यक्तींनी ‘वरून’ आदेश आला आहे म्हणून उभा राहिलो. मागील ३५ वर्षात मी कधीही मसपच्या कार्यक्रमाला आलो नव्हतो. साहित्याशी माझा संबंध नाही. पण वरून आदेश आला म्हणून अर्ज भरला, असे प्रत्यक्ष सांगितले आहे.

आता अध्यक्ष म्हणून ज्या दीपाली काळे शर्यतीत होत्या. त्यांनी मागील ४० वर्षात समर्पित भावाने साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम केले आहे. अशा प्रतिष्ठीत व्यक्तिला अध्यक्ष होऊ न देण्याचे पुण्यकर्म करून आपण आणि पै यांनी काय साधले. एकीकडे आपण तडजोड करू असे सांगत बेसावध ठेवले. आपण चाचपणी करूनही आपणास दुसरे संपादक मिळाले नाहीत म्हणून मला संपादकपदी ठेवण्याची तुमची अपरिहार्यता होती. आज आपण मसप डोंबिवली शाखेवर वर्चस्व मिळवले. अशाच पध्दतीने आपण इतरही शाखांवर वर्चस्व मिळवणार. आपल्या या प्रयत्नांमुळे आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक वर्ष काम करूनही कोणाच्या तरी आदेशामुळे कस्पटासमान बाहेर फेकले जाणार हे स्पष्ट झाले आहे.

अविश्वासाच्या वातावरणात आपणा बरोबर काम करणे मला जमणार नाही. आणि अध्यक्ष म्हणून आपण केलेल्या हस्तक्षेपाचा निषेध म्हणून दोन्ही पदाचा राजीनामा देत आहे, असे देशपांडे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

‘मसप’ पुणे संस्थेच्या मध्यवर्ति घटनेप्रमाणे शाखांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी आपण आग्रही राहिलो. ते जर त्यांना दडपण वाटत असेल तर आश्चर्य आहे. कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव येथे नव्हता. प्रत्येकाला शाखेत संधी मिळाली पाहिजे. – योगेश सोमण, अध्यक्ष, मसाप, पुणे.

मसाप डोंबिवली शाखेच निवडणूक बिनविरोध शांतते पार पडली. – पुंडलिक पै, संचालक, पै फ्रेन्डस लायब्ररी.