ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्यात अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारती कोसळून जिवितहानी होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहरात सर्वेक्षण करून अशा इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. अशाचप्रकारे यंदाही पालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय शहरातील इमारतीचे सर्वेक्षण सुरू केले असून एप्रिल महिनाअखेरपर्यंत हे काम पुर्ण करून प्रशासनाकडून अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाणार आहे. यातील अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापुर्वी म्हणजेच मे महिन्यात रिकाम्या करण्याची कारवाई प्रशासनाकडून हाती घेतली जाणार आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दुजोरा दिला आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापुर्वी शहरातील अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. अशीच यादी दोन महिन्यांपुर्वी ठाणे महापालिका प्रशासनाने जाहीर केली होती. यानुसार संपुर्ण शहरात ४ हजार २९७ इमारती धोकादायक असून त्यामध्ये ८६ इमारती अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी २५ इमारती पालिकेने यापुर्वीच रिकाम्या केल्या आहेत. तर, उर्वरित इमारती रहिवाशांच्या विरोधामुळे रिकाम्या होऊ शकलेल्या नाहीत. यामध्ये काही ठिकाणी एकाच इमारतींचे दोनदा संरचनात्मक परिक्षण करण्यात आले असून त्यामध्ये एक अहवाल अतिधोकादायक तर दुसरा अहवाल धोकादायक असा परस्परविरोधी आले होते. यावरून वादही झाले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण अहवाल परस्पर विरोधी आले आहेत. त्या इमारतींचे दोन्ही संरचनात्मक परिक्षक आणि पालिकेने नियुक्त केलेले त्रयस्थ परिक्षक यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी, अशा स्पष्ट सुचना दिल्या होत्या. याशिवाय, जे संरचनात्मक परिक्षक दिशाभुल करणारा अहवाल देतील, त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
नव्याने सर्वेक्षण
ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यानुसार प्रभाग समितीनिहाय कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि त्यांचे पथक इमारतींची पाहाणी करत आहेत. त्यात ज्या इमारती मोडकळीस आल्याचे दिसून येते. त्या इमारतींचा अतिधोकादायक इमारतींच्या यादी समावेश केला जात आहे. मात्र, ही पद्धत यापुर्वीच वादग्रस्त ठरलेली आहे. त्यामुळे पालिकेच्या पथकाने अतिधोकादायक इमारत ठरविलेल्या इमारतीबाबत रहिवाशांची तक्रार असेल तर, पालिका रहिवाशांकडून इमारतीचा संरचनात्मक परिक्षण अहवाल घेऊन त्याची खातरजमा करते. तसेच अहवालानुसार त्या इमारतींचा समावेश ठरवून दिलेल्या वर्गवारीत करण्यात येतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.
धोकादायक इमारतींची वर्गवारी
ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे.