scorecardresearch

मोघरपाडय़ातील मेट्रो कारशेडच्या जागेचे सर्वेक्षण सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जागेचे सर्वेक्षण करताना पंचनामे देण्याचा निर्णय झाला होता

प्रतिनिधिक छायाचित्र

शेतकऱ्यांचा असहकार, सर्वेक्षण न करताच अधिकारी माघारी

ठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो -४ प्रकल्पाच्या कारशेडसाठी घोडबंदर भागातील मोघरपाडय़ातील जागा देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत जागेचे सर्वेक्षण करताना पंचनामे देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून जागेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले. या सर्वेक्षणादरम्यान शेतकऱ्यांना पंचनामे देण्यास एमएमआरडीएने असमर्थता दाखविली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत असहकार पुकारला. त्यामुळे अधिकाऱ्यांना सर्वेक्षण न करताच परतावे लागले.

 मोघरपाडय़ातील जमीन १९६० मध्ये शासनाने १६७ शेतकऱ्यांना वितरित केली असून त्याचे प्रत्येकी ६४ गुंठे इतके क्षेत्रफळ आहे. या जमिनीवर गेल्या ६० वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्र भातशेती व इतर व्यवसाय करीत आहेत. या जागेवर एमएमआरडीएने मेट्रो -४ च्या कारशेडसाठी आरक्षण टाकले असून यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला कारशेडच्या कामाला विरोध केला होता. यामुळे या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम होऊ शकले नव्हते. हा तिढा सोडविण्यासाठी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी एक बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्यात सर्वेक्षण करीत असताना शेतकऱ्यांच्या नावाची नोंद जागेवर करावी तसेच मेट्रो कारशेडची जागा एमएमआरडीएला देत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. त्याचप्रमाणे कारशेड आणि महापालिकेला उद्यानाकरिता जमीन दिल्यानंतर उर्वरित जागेवर कुठल्याही प्रकारचे आरक्षण टाकू नये आणि ती जमीन सर्व शेतकऱ्यांना विभागून द्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या.

बैठकी दरम्यान, या मागण्या जिल्हाधिकारी व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्यामुळे सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी एमएमआरडीएच्या आधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी मोघरपाडा येथे गेले होते. त्यावेळेस एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची जागेवर नोंद करून पंचनामे देण्यास नकार दिला. यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांनी परिसरातील मंदिरात बैठक घेऊन असहकारची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जागेचे सर्वेक्षण करताना पंचनामे देण्याचा निर्णय झाला होता. तरीही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सुरू केलेल्या सर्वेक्षणादरम्यान शेतकऱ्यांना पंचनामे देण्यास असमर्थता दाखविली आहे. यामुळे सर्वेक्षणाला विरोध करायचा नाही पण, सर्वेक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना जमीन दाखविण्यासाठी कोणतेही सहकार्य करायचे नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, अशी माहिती स्थानिक शेतकरी संजय पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Survey of metro car shed site at mogharpada begins zws

ताज्या बातम्या