‘सूर्या’ प्रकल्प अखेर पूर्ण

दोन दिवसांनंतर टप्प्याटप्प्याने पाणी शहरात वितरित

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अनेक अडथळे पार करत प्रकल्प पूर्ण; दोन दिवसांनंतर टप्प्याटप्प्याने पाणी शहरात वितरित

वसई-विरार शहराला शंभर दशलक्ष लिटर पाणी देणारा सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा तिसरा टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. अनेक अडथळे पार करीत या टप्प्यातील पाणी गुरुवारी रात्री शहराच्या वेशीवरील जलकुंभापर्यंत आले आहे. दोन दिवसांच्या चाचणीनंतर टप्प्याटप्प्याने हे पाणी शहरात वितरित केले जाणार आहे. पाण्याच्या वितरणासाठी अमृत योजनेंतर्गत जलकुंभ बांधून जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २० लाखांहून अधिक आहे. सध्या शहराला पापडखिंड, उसगाव, पेल्हार आणि सूर्या धरणातून १३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली होती. शहराची ही गरज ओळखून सूर्या धरणाच्या तिसऱ्या टप्प्याची योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना ३०० कोटी रुपयांची असून त्याद्वारे वसई-विरार शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. सूर्या धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील ही योजना पालिका राबवीत आहे. त्यासाठी नगरोत्थानमधून ५० टक्के  निधी मंजूर झालेला होता. सुमारे ३०० कोटींच्या या योजनेतून वसई-विरारमधील रहिवाशांना सूर्या धरणातून पाणी मिळणार आहे. धरणाच्या कवडास बंधाऱ्यातील अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर पाणी दुक्टण येथील जलशुद्धीकरणात प्रकल्पात आणून तेथून काशिदकोपर येथील जलकुंभात आणले गेले आहे. कार्यादेश मिळाल्यानंतर २०१४ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. याच योजनेच्या मार्गात अनेक अडथळे आले होते. वनखात्याची जमिनीमुळे काम रखडवलले होते. त्यानंतर हरित लवादाने या योजनेच्या मार्गातील झाडे कापण्यासाठी आक्षेप घेतला होता.

वनखात्याला पर्यायी जमीन दिल्यानंतर अडथळा दूर झाला होता, परंतु मे महिन्यांत जलवाहिनीच्या मार्गात ६० मीटर लांबीचा दगड लागला होता. तो फोडण्यासाठी महामार्गालगत वनखात्याच्या जमिनीत खड्डा खणून त्याखाली भुयार खणण्यात आले होते. त्या भुयारातून अत्याधुनिक यंत्रणा टाकून दगड फोडण्याचे काम सुरू होते. महिनाभर या कामामुळे विलंब झाला होता. २० जूनला दगड फोडून पूर्ण झाला आणि मग तेथून पुढे जलवाहिन्या टाकण्यात आल्या, असे या योजनेवर काम करणारे नगरसेवक आणि माजी पाणीपुरवठा सभापती प्रफुल्ल साने यांनी सांगितले.

१४५ कोटींची अमृत योजनाही पूर्ण

सूर्या टप्पा क्रमांक-३चे पाणी शहरात आल्यानंतर त्याचे वितरण होणे गरजेचे होते. वितरणाची व्यवस्था झाली नसती तर शहर तहानलेलेच राहिले असते. यासाठी वसई-विरार महापालिकेने १३६ कोटींची अमृत योजना मंजूर करून घेतली. त्या योजनेअंतर्गत शहरात २१ ठिकाणी मोठे जलकुंभ उभारले असून ३१० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याचा दाब असमतोल होता. तो तपासून सर्व जलवाहिन्यांतून पाणी समान दाबाने जाईल याची खात्री करून घेण्यात आली. सुरुवातीला ५० दशलक्ष लिटर पाणी नागरिकांना मिळणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शंभर दशलक्ष लिटर पाणी शहरात येणार आहे.

विलंब लागला असला तरीही विक्रमी वेळेत ही योजना पूर्ण झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रवीणा ठाकूर तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केल्याने ही योजना पूर्ण होऊ शकली आहे. त्यामुळे आता शहरात नवीन नळजोडण्या देण्यात येणार आहेत.  सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Surya dam full by water due to good rainfall

ताज्या बातम्या