देशभरातील सर्वात मोठय़ा सोसायटींमधील एक मानल्या जाणाऱ्या अंबरनाथ येथील सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीचा अटी-शर्ती भंगाचा प्रश्न गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. शासनाचे महसूल खाते या प्रश्नी केवळ कोरडी आश्वासने देत आहेत. त्यामुळे सोसायटीत राहणारे हजारो नागरिक हवालदिल झाले आहेत.
अंबरनाथमध्ये १९४७ मध्ये ही सोसायटी स्थापन झाली. सोसायटीने शासनाकडून बाजारभावाने जमीन विकत घेतली आणि सदस्यांना दिली. यामध्ये काही अटी शासनाने घातल्या आणि या अटी-शर्त भंग झाला म्हणून गेल्या दहा वर्षांपासून या सोसायटीतील खरेदी-विक्री आणि हस्तांतर बंद झालेले आहे. या सोसायटीत २५ हजारांहून अधिक नागरिक राहतात. गेल्या दहा वर्षांत लोकसभा, विधानसभा आणि पालिका यांच्या किमान दोन निवडणुका पार पडल्या. मात्र कोणत्याही पक्षाने आश्वासनांखेरीज या सोसायटीच्या नागरिकांना काहीही दिले नाही. राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरेंपासून ते आताचे महसुलमंत्री एकनाथ खडसेंपर्यंत ते येथील खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या कानावर रहिवाशांनी हे गाऱ्हाणे घातले असले तरीही हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथचे महत्त्वाचे दोन प्रश्न शिवसेना प्राधान्याने सोडवेल असे जाहीर वचन दिले. त्यातील प्राचीन शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्प मार्गी लागला. मात्र सूर्योदय सोसायटीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर आंदोलनाची राळ उठविणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे आता गप्प का आहेत, असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
सूर्योदय सोसायटीचा प्रश्न २००२पासून प्रलंबित आहे. शासनाच्या सर्व विभागांना सोसायटी गेली अनेक वर्षे पत्रव्यवहार करत आहे; पण याला कोणीच दाद देत नाहीत. अनेक जण याबाबत आश्वासने देत आहेत, मात्र अद्यापही त्याची पूर्तता न झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत.
शोभा शेट्टी, अध्यक्ष, सूर्योदय गृहनिर्माण सोसायटी