ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध गौरव स्विटस या मिठाई दुकानाबाहेरील जागेत लावलेल्या स्टाॅलवर महापालिकेमार्फत कारवाई करण्याची भिती दाखवून या दुकान मालकाकडून दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्या सुशांत सुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. सुशांत सुर्वे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या संदर्भातील लाच प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे सुशांत सुर्वे याच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा खंडणीचे सत्र सुरुच ठेवल्याचे उघड झाले आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचने काही दिवसांपूर्वीच गौरव स्विट या मिठाईच्या दुकानदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सुशांत सुर्वे आणि अक्षय करंजवकर यांना अटक केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मानपाडा येथील कॉसमॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात असताना अक्षय करंजवकर हा त्यांच्या दुकानात आला. त्याने स्वतःला माहीती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर दुकानाबाहेर स्टॉल लावल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगत त्याचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. तसेच महापालिकेत तक्रार करून दुकानांवर कारवाई करवून घेण्याची धमकी दिली.

खंडणीची मागणी

त्यानंतर ‘महिन्याला काही रक्कम द्या, नाहीतर तक्रारी करून कारवाई करायला लावू’ असे सांगत खंडणीची मागणी केली. पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही त्याने ठाणे महापालिकेत तक्रार अर्ज करून पाठपुरावा सुरू ठेवला. याच दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे याने पटेल यांना व्हॉट्सअ कॉल करून अक्षय करंजवकरसोबत तडजोड करून देण्याचे सांगितले.

सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली होती. यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सलील भोसले, सहायक पोलिस निरिक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकाने १३ मार्चला वसंत विहार परिसरात सापळा रचला. याच दरम्यान, दोघांनी तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करत ते पैसे घेण्यासाठी वसंत विहार चौकात आले. त्यावेळी पटेल यांच्याकडून दोन लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली होती.

सुर्वे याला कोणाचा पाठिंबा?

दरम्यान, ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांना वर्षभरापूर्वीच एका बांधकाम व्यवसायिकाकडून २५ लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या प्रकरणात शंकर पाटोळे यांच्यासोबत सुशांत सुर्वे याला देखील अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा एकदा खंडणीचे प्रकार सुरु केल्याचे त्याच्याविरोधात झालेल्या कारवाईमुळे उघड झाले आहे. सुर्वे याला आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. परंतु कारवाई झाल्यानंतरही त्याच्याकडून खंडणीसत्र सुरु असल्याने सुर्वे याला नेमका कोणाचा पाठिंबा आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.