कल्याण- मध्य रेल्वेच्या कल्याण येथील लोको शेडमध्ये कार्यरत विनोद कुमार मीना (३२) या तंत्रज्ञाचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विनोद यांचा मृत्यू दोन दिवसापूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पोलिसांनी पाठविला आहे.
मीना हे कल्याण पूर्वेतील रेल्वे वसाहतीमधील घरात एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंब राजस्थान येथे राहते. दोन दिवसापासून त्यांचे कुटुंबीय त्यांना मोबाईलवर संपर्क साधत आहेत. ते प्रतिसाद देत नव्हते. कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली होती. कुटुंबीयांनी विनोद यांच्या एका मित्राला संपर्क करुन त्यांना ते राहत असलेल्या घरी जाण्यास सांगितले होते. मित्र घरी गेल्यावर दरवाजाला आतून कडी होती. आतून कोणीही प्रतिसाद देत नव्हते. ही माहिती मित्राने रेल्वे कर्मचारी आणि कोळसेवाडी पोलिसांना दिली. कोळसेवाडी पोलिसांनी घराची आतील कडी तोडून घरात प्रवेश केला. घरात सामान अस्ताव्यस्त पडले होते. विनोद पलंगाखाली मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी विनोद यांच्या मित्रांशी संपर्क करुन, परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.



