तलाव बंद होण्याच्या भीतीने शिबिरांना अत्यल्प प्रतिसाद
पाणीटंचाईमुळे एकीकडे ठाण्यातील तरणतलाव बंद केले असले तरी कल्याण-डोंबिवलीतील तरणतलाव मात्र अजूनही सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने जलतरणाची हौस भागवणारी मुले यंदा कल्याण-डोंबिवलीतील तलावांकडे वळतील असा अंदाज बांधला जात होता; परंतु वाढत्या पाणीसंकटामुळे तरणतलाव बंद पडतील, या भीतीने डोंबिवलीतील उन्हाळी जलतरण शिबिरांकडे यंदा बहुतांश लोकांनी पाठ फिरवली
उन्हाळी सुट्टय़ा सुरू झाल्या की विविध जलतरण तलावांच्या ठिकाणी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. डोंबिवलीत तीन जलतरण तलाव असून येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांची सुरुवात झाली आहे. मात्र, या ठिकाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रशिक्षणार्थी मुलांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली जिमखाना येथे उन्हाळी शिबिरास सुरुवात झाली. गेल्या वर्षी ५०० ते ६०० प्रशिक्षणार्थी या शिबिरात सहभागी झाली होती. या वर्षी आत्तापर्यंत हा आकडा शंभपर्यंतही पोहोचलेला नाही, अशी माहिती जिमखान्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. एप्रिल महिनाअखेपर्यंत ही संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आहे. श्री मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादित आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी १६ एप्रिलपासून जलतरण शिबिरास सुरुवात झाली. गेल्या वर्षी या काळात ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. या वर्षी आत्तापर्यंत शंभर ते सव्वाशे नोंदण्या झाल्या आहेत. खासगी जलतरण तलावांपेक्षा महापालिकेच्या तलावाचे प्रवेश शुल्क कमी आहे, तरीही संख्या घटल्याचे चित्र आहे. डोंबिवलीतील तरण तलावांकडे जलशुद्धीकरण केंद्र असल्याने पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते. शिवाय तलावांचे शॉवर गेल्याच महिन्यात बंद करण्यात आले आहेत. यामुळे पाण्याची नासाडी होत नाही, असा दावा व्यवस्थापनाकडून केला जात आहे. असे असले तरी पाणी टंचाईमुळे कधीही तरण तलाव बंद होतील या भीतीने यंदा सदस्यत्व घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे, असे व्यवस्थापनांचे म्हणणे आहे.

ठाणेकरांचा मोर्चा डोंबिवलीच्या दिशेने
ठाणे येथील तरण तलाव बंद असल्याने ठाणेकरांनी आपला मोर्चा डोंबिवलीतील पालिकेच्या तरण तलावांकडे वळविला आहे. दिवसाला २५ रुपये भरून पोहण्याचा आनंद या ठिकाणी ठाणेकर मुले, मुली घेत आहेत.