कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत स्वाईन फ्लुचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांनी खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार घेतले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. हे दोन्ही रुग्ण वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे विश्रांती घेत आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या कार्यावाहक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लुचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने बाधित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या शिंतोडे, थेंबांद्वारे या आजाराचा प्रसार होऊ शकतो. या आजारामध्ये प्रामुख्याने तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात, असे डाॅ. शुक्ला यांनी सांगितले.
नागरिकांना यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः औषधोपचार न करता त्वरित कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय तसेच महानगरपालिकेच्या ३५ नागरी आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
बचावासाठी उपाय
वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यूचा वापर करावा, संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी पिऊन शरीरात पुरेशा प्रमाणात द्रव ठेवावा, गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करावा, आजारी असल्यास अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत स्वाइन फ्लू संदर्भात आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयांशी संपर्क साधावा.
हातगाड्या सुरूच
पावसाळ्यात संसर्गजन्य वाढत असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून जून महिन्यात पालिका हद्दीतील वडापाव, पाणीपुरी, भेळपुरी, उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या गाड्या बंद केल्या जातात. परंतु, यावर्षी पालिकेच्या प्रभागस्तरावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हातगाडी चालकांना फक्त नोटिसा देण्या व्यतिरिक्त त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. त्यामुळे पालिकेच्या डोंबिवली ई प्रभाग हद्दीतील पेंढरकर महाविद्यालयाजवळील खाऊ गल्ली, डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक, कल्याण पूर्वेतील सर्व प्रभागांमध्ये, कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ल्यांमध्ये उघड्यावर सर्रास खाद्य पदार्थ विकले जात आहेत. कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात हातगाडी, फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी क प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगार पाठबळ देत असल्याच्या आणि या प्रभागात फेरीवाल्यांकडून मोठा दौलतजादा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.
