ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर फेरीवाल्यांकडून ५२ वर्षीय महिलेला मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर खासदार राजन विचारे यांनी महापालिका, रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना पत्र व्यवहार करून फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईस टाळाटाळ केल्यास जनआंदोलनाचा इशाराही त्यांनी केली आहे. तसेच महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने समन्वय साधून या भागात जबाबदार अधिकारी नेमण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा >>>उड्डाण तसेच पादचारी पुलांच्या कामांच्या दर्जा बाबत तडजोड नको ; ठाणे महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सुचना

कोपरी येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलाचा ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर फेरीवाल्याने विनयभंग आणि मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकारामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरात महापालिका, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांची हद्द येते. या फेरीवाल्यांवर कारवाई करताना संबंधित विभागांकडून हद्दीचा वाद निर्माण केला जातो आणि कारवाईस टाळाटाळ होत असते. त्यामुळे शुक्रवारी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त ऋषी शुक्ला आणि रेल्वे पोलीस आयुक्त केसर खलीद यांना पत्र व्यवहार करून फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिका शहर अभियंता पदी अर्जुन अहिरे

तसेच हद्दीच्या वादातून अनेकदा मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधून एक जबाबदार अधिकारी नेमावा. जेणेकरून यासंदर्भात फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानक होण्यास मदत होईल. याची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकापासून करण्यात यावी हा प्रयोग इतर स्थानकातही करण्यात यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. तसेच कारवाई टाळल्यास जन आंदोलन केले जाईल. असा इशाराही त्यांनी दिला.