कल्याण : दरवर्षी बुध्द पौर्णिमेला राज्याच्या विविध भागातील जंगलांमध्ये वनविभाग, पक्षी, निसर्गप्रेमी यांच्या माध्यमातून पक्षी गणना केली जाते. बुध्द पौर्णिमेनिमित्त ३१ एप्रिलच्या मध्यरात्री ते १ मे रोजी शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात करण्यात आलेल्या पक्षी गणनेत विविध पक्ष्यांचा एकूण ४१ प्रजाती आढळल्या. यामध्ये १४ सस्तन तर, ७ सरपटणाऱ्या प्रजातींची नोंद करण्यात आली.
ब्रिटिश काळापासून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य हे राखीव वनक्षेत्र म्हणून ओळखले जाते. तानसा, वैतरणा, अपर मोडकसागर, भातसा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हा भूभाग येतो. या भागात घनदाट जंगलांबरोबर पाणवठ्यांमुळे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी यांचा याठिकाणी अनेक वर्षापासुनचा अधिवास आहे. विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी या ठिकाणी हंगामाप्रमाणे येतात. हंगाम संपला की निघून जातात. पक्षी, प्राण्यांचे अभ्यासक यांचा या भागात नेहमीच संचार असतो.
१ मे रोजी बुध्द पौर्णिमा होती. शहापूर वन विभाग आणि तानसा अभयारण्य वन विभागाने तानसा अभयारण्यात पक्षी गणनेसाठी दहा दिवस अगोदर रात्रीच्या वेळेत पक्ष्यांची टेहळणी करण्यासाठी जंगलाच्या विविध भागात टेहळणी मचाणांची उभारणी केली होती. शहापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई, साहाय्यक उपवनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मचाण उभारणी आणि पक्षी गणनेचा उपक्रम वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पक्षी, निसर्गप्रेमींच्या साहाय्याने आयोजित करण्यात आला होता. तानसा अभयारण्यातील पाणवठे असलेल्या भागात या दहाहून अधिक मचाणांची बांधणी करण्यात आली होती. पक्षी पाणी पिण्यासाठी संध्याकाळी, रात्री जलस्त्रोतांच्या ठिकाणी येतात. त्यामुळे पाणवठ्यांच्या भागात टेहळणी मनोरे उभारण्यात आले होते.
तानसा अभयारण्य परिसरातील १ मे रोजी अघई, वेडवाहळ, साखरोली, केळीचेपाणी, बोरद्याचे पाणी, पाझर तलाव, वनमोरी नाला आणि जंगलाच्या गाभा क्षेत्रात पक्षी गणना झाली. घनदाट जंगलात कीर्र रात्रीचे वन जीवनातील अनुभव वन विभागाचे कर्मचारी, पक्षी प्रेमींनी अनुभले. रात्रीच्या वेळेत पक्ष्यांचे विविध प्रकारचे चित्कार, आपल्या जोडीदार, गटाला देण्यात येणारे इशारे पक्षी निरीक्षकांनी अनुभवले. हिंस्त्र प्राणी आसपास असेल तर एकमेकांना सावध करण्याच्या इशाऱ्यांचा अनुभव निरीक्षकांनी घेतला.
पाणवठ्यांवर पाणी पिण्यास आलेल्या भेकर, साळिंदर, वानर, माकड, मांजर, रान मांजर, उदमांजर, मुंगूस, ससा, डुक्कर, चौशिंगा, उडणारी खार, वटवाघूळ, कोल्हे, लांडगे, कीटक भक्षी या प्राण्यांची नोंद यावेळी करण्यात आली. पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात हे पक्षी स्पष्टपणे निरीक्षकांना पाहता आले. धुळवाटेवरील धुळीत उमटलेल्या प्राण्यांच्या पायांचे ठसे मोजता आले. धामण, साप, दीवड, घोणस, पाल, मण्यार, सरडे, बेडुक, पाल या प्रजातींची यावेळी नोंद करण्यात आली.
याशिवाय झाडांच्या फांद्या, खोबणीत पट्टेरी वनघुबड, पिंगळा, जंगली पिंगळा, गव्हाणी घुबड, नीलमणी, सूर्यपक्षी, भेरा, भृंगराज, पावशा, मोरघी, तुरेवाला, टिटवी, सर्पगरुड, मोर, कोतवाल, नारंगी डोक्याचा कस्तूर, डोमकावळा, सुतारपक्षी, सातभाई, पाकोळी या प्रजातींची यावेळी नोंद करण्यात आली.
वन विभागाचे कर्मचारी, पक्षी, निसर्गप्रेमी यांच्या सहकार्याने हा पक्षी गणनेचा उपक्रम राबविण्यात आला. तानसा अभयारण्यातील विविध प्रजातींची या गणनेच्यानिमित्ताने नोंद करण्यात आली. या भागातील विविध पक्ष्यांचा अधिवास यानिमित्ताने स्पष्ट झाला. – गणेश परहर, वनपरीक्षेत्र अधिकारी, तानसा अभयारण्य.
बुध्द पौर्णिमेच्या अगोदरपासून तानसा अभयारण्यात विविध ठिकाणी पक्षी गणनेसाठी मचाण उभारणी केली जाते. एक वेगळा आनंद यात असतो. पक्षी गणनेच्या दिवशी जंगलात वन कर्मचारी, निसर्गप्रेमींना येणारे अनुभव थरारक असतात. यानिमित्ताने निसर्गाचा वेगळा अनुभव घेता येतो. – रोहिदास डगळे, तानसा वन्यजीव सल्लागार समिती.
